Solapurkar's choice for the Khajur from Iran and Saudi Arabia | इराण अन् सौदीवरून आलेल्या खजुरांना सोलापूरकरांची पसंती
इराण अन् सौदीवरून आलेल्या खजुरांना सोलापूरकरांची पसंती

ठळक मुद्देपवित्र रमजान महिन्यात इतर खाद्यपदार्थांपेक्षा खजुराला सर्वाधिक महत्त्व आहे. मुस्लीम बांधव उपवास सोडण्यासाठी प्रामुख्याने खजुराचे सेवन करतात.इराण व सौदी अरेबियाहून आलेल्या अजवा, किमया, इराणी, सुलतान, कौसर, सुन्नत या खजुरांना सर्वाधिक मागणी

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पवित्र रमजान महिन्यात इतर खाद्यपदार्थांपेक्षा खजुराला सर्वाधिक महत्त्व आहे. मुस्लीम बांधव उपवास सोडण्यासाठी प्रामुख्याने खजुराचे सेवन करतात. गुणवत्ता व आकारानुसार खजुराचे विविध दर पाहावयास मिळतात़ इराण व सौदी अरेबियाहून आलेल्या अजवा, किमया, इराणी, सुलतान, कौसर, सुन्नत या खजुरांना सर्वाधिक मागणी आहे़ रमजान महिन्यात १ कोटीहून अधिक उलाढाल खजुराच्या विक्रीतून होत असल्याची माहिती विजापूर वेसमधील खजूर विक्रेते इजाज बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

रमजान महिन्यात खजुराला मोठी मागणी असते. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी परदेशातून मोठ्या प्रमाणावर खजुराचा माल आणला आहे. अगदी ८० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत खजुराची विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खजुराचे उत्पादन घटल्याने भाव वधारले असले, तरी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

विजापूर वेस, बेगम पेठ, नई जिंदगी परिसरातील बाजारपेठेत १५० पेक्षा अधिक प्रकारचे खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ खजुरासह बदाम, काजू, पिस्ता, चारोळी, किसमिस या सुकामेव्याला अधिक मागणी आहे. रमजान ईदपर्यंत शहरातील खजुराची आवक आणखी वाढणार असून, तेव्हा दरात फरक पडू शकतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.

आरोग्यासाठी खजूर गुणकारी...
- खजुराचे सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते़ खजुराचे नियमित सेवन केल्याने थकवा जाणवत नाही़ शिवाय अजवा खजुराची पावडर बनवून ती नियमित सेवन केल्याने हृदयरोग, कॅन्सर आदी गंभीर आजारापासून दूर राहता येते़ याशिवाय दररोज ७ खजुराचे सेवन केल्याने आरोग्य आयुष्यभरासाठी निरोगी राहते़ खजुराला अलीकडच्या काळात आयुर्वेदिक महत्त्व प्राप्त झाल्याने बाजारपेठांमध्ये खरेदी वाढल्याची माहिती आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ़ क्रांतिवीर महिंद्रकर यांनी दिली़ 

असे आहेत खजुराचे दर (प्रतिकिलो)

 • - अजवा - २२०० रुपये 
 • - कलमी - ७०० रुपये
 • - लकी - ३५० रुपये
 • - कौसर - ३२० रुपये
 • - तौहिद - ३५० रुपये
 • - किमया - ३०० रुपये
 • - इराणी - १०० रुपये
 • - बरारी - ५०० रुपये
 • - सुलतान - ३५० रुपये
 • - सुन्नत - ३५० रुपये
 • - मारिया - ३०० रुपये

रमजानकाळात १ कोटीची उलाढाल
- रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांसह हिंदू धर्मातील सर्वच जातीधर्मातील लोक खजुराची खरेदी करतात़ शहरात विजापूर वेस, नई जिंदगी, बेगम पेठ, विविध ठिकाणी उभारण्यात आलेले छोटे-मोठे स्टॉल, मॉल्स, बाजारपेठा येथून खजुराची विक्री होते़ साधारणत: १ कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल या रमजान महिन्यात होत असल्याची माहिती इजाज बागवान यांनी दिली़ 

४० टक्क्यांनी दरात झाली वाढ
- महागाई, वाढलेले इंधनाचे दर, वाहतुकीचे वाढलेले दर त्यात जीएसटीची आलेली नवीन करप्रणाली यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा खजुराच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे़ सोलापूरच्या बाजारपेठेत शक्यतो इराण व सौदी अरेबियाहून अधिक माल येतो़ 

सध्या वाढत्या उन्हामुळे तसेच वाढलेल्या दरामुळे रमजानचा पवित्रा महिना असूनही, मुस्लीम बांधवांकडून खजुराला गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी मागणी घटली आहे़ एवढेच नव्हे तरे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्क्यांनी दरही वाढले आहेत. दरवाढीचादेखील मागणीवर परिणाम बाजारपेठेवर झाला आहे़
- अब्दुल सत्तार उस्ताद,
खजूर विक्रेते, सोलापूऱ

रमजान महिन्यात सुट्या खजुराला अधिक मागणी असते. ५० ते ७० रुपये किलो दर असलेल्या पिवळ्या रंगाच्या खजुराची सर्वाधिक विक्री होत आहे. यंदा १०० रुपयांपासून ते १० हजार रुपये किलोपर्यंत खजूर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत़ 
-इजाज बागवान
खजूर विक्रेते, विजापूर वेस, 


Web Title: Solapurkar's choice for the Khajur from Iran and Saudi Arabia
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.