- अप्पासाहेब पाटील, सोलापूरसोलापूरमध्ये एका टेक्स्टाईल युनिटमध्ये आग लागून दुर्दैवी घटना घडली. यात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. घटनेबद्दल ऐकून माझे मन व्यथित झाले, असे म्हणत पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागांमधील एका टावेल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागली होती. यादीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामन दलाच्या शंभरहून अधिक गाड्या पाण्याचा मारा केल्यानंतर सायंकाळी आठ वाजण्याची सुमारास आग आटोक्यात आली.
CM फडणवीस म्हणाले, ही घटना अतिशय दुःखद
'सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
वाचा >>सोलापूर आग दुर्घटना; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
'महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आगीच्या घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने मी व्यथित आहे. ज्यांनी या घटनेत आपल्या प्रियजणांना गमावले, त्यांच्या प्रति मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो. पीएमएनआरएफ मधून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजारांची मदत करण्यात येईल', असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
रविवारी झालेल्या दुर्घटनेमुळे सोलापूरकर सुन्न झाले असून मृतांच्या कुटुंबिया बद्दल राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. रविवारी दिवसभर विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. टॉवेल कारखान्याला आज नेमकी कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नाही.
एकनाथ शिंदेंनीही दिले मदतीचे निर्देश
सोलापूरच्या अग्नीतांडवामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन लावून घडलेल्या घटनेची चौकशी केली आणि आर्थिक मदत करण्यास सांगितले.