सोलापूर जिल्ह्यात लाळ, घटसर्प रोगांचा ४ हजार जनावरांना प्रादुर्भाव, २० जनावरे दगावली
By Admin | Updated: March 24, 2017 14:55 IST2017-03-24T14:55:14+5:302017-03-24T14:55:14+5:30
सोलापूर जिल्ह्यात लाळ, घटसर्प रोगांचा ४ हजार जनावरांना प्रादुर्भाव, २० जनावरे दगावली

सोलापूर जिल्ह्यात लाळ, घटसर्प रोगांचा ४ हजार जनावरांना प्रादुर्भाव, २० जनावरे दगावली
सोलापूर जिल्ह्यात लाळ, घटसर्प रोगांचा ४ हजार जनावरांना प्रादुर्भाव, २० जनावरे दगावली
गुरसाळे : पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावात मागील १० दिवसांपासून घटसर्प व लाळ रोगाने थैमान घातले आहे. आजवर सात शेतकऱ्यांची २० जनावरे दगावली आहेत. जर्सी गार्इंना लाळीने घेरले असल्याने दूध उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकारी व डॉक्टर गावात उपचार करीत असले तरी रोगावर मात्र नियंत्रण येत नसल्याने पशुपालक धास्तावला आहे.
खेडभोसे (ता. पंढरपूर) येथे शेतकऱ्यांकडे सुमारे पाच हजाराहून अधिक जनावरे आहेत. जर्सी गाई, बैल, म्हैस, शेळ्या यांचा त्यात समावेश आहे. गावात १५ दूध डेअरीच्या माध्यमातून दररोज १० हजार लिटर दूध संकलन होत होते. मात्र मागील १२ दिवसापासून लाळ व घटसर्प रोगाने गावात थैमान घातले असून आजवर सात शेतकऱ्यांची २० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते बंडू पवार यांनी सांगितले.
गावातील पशुपालक सत्यवान मोरे (३), सिद्धेश्वर पवार (२), प्रशांत पवार (२), बंडू पवार (२), विनायक पवार (२), नवनाथ माने (२), अशोक साळुंखे (२) यासह २० जनावरे दगावली आहेत. जनावरांच्या तोंडाला लाळ येणे, ताप येणे, डरंगळणे, अशक्तपणा येणे, जनावरांच्या गळ्याला मोठी गाठ येऊन श्वास बंद होणे अशी लक्षणे या रोगाची आहेत. जर्सी गायीचे प्रमाण गावात जास्त असून पशुपालकांनी बॅँका, पतसंस्था व खाजगी सावकारांकडून कर्ज काढून जर्सी गायी खरेदी केल्या आहेत. या जर्सी गायींना सुरूवातीला ताप येऊन लाळ गळते. त्यामुळे दूध बंद होऊन ८-१० दिवसात गाय मृत्युमुखी पडत आहे. त्यामुळे पशुपालक धास्तावला आहे.
दरम्यान घटसर्प व लाळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी निंबाळकर यांनी तालुक्यातील १० डॉक्टरांची टिम तयार करून गेले पाच दिवसापासून गावात तळ ठोकला आहे. परंतु जनावरे मरण्याचे प्रमाण थांबत नाही. शिवाय सिद्धेश्वर पाटील यांच्या गायीचे पोस्टमार्टम करून पुणे प्रयोगशाळेकडे अवयव पाठविले आहेत.
::::::::::::::::::::::::::::::
लाळ व घटसर्प रोगाचे लसीकरण ज्यावेळी पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू असते. त्यावेळी शेतकरी लसीकरण करून घेत नाहीत. डॉक्टरांनी दिलेला सल्ला हा जनावरांच्या हितासाठी महत्त्वाचा असतो. सध्या गावात १० डॉक्टर, परिचर व औषधेही दिली आहेत. साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. चंद्रकांत निंबाळकर
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी
::::::::::::::::::::::::
गावातील शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यात लाळ व घटसर्प रोगाने २० जनावरे दगावली आहेत. दूध संकलन मोठ्या प्रमाणात घटल्य९ाने शेतकरी अडचणीत आला आहे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, अशा शेतकऱ्यांना आ. बबनराव शिंदे, आ. प्रशांत परिचारक, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी मदत देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करावा. साथ आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांनीही प्रयत्न केला पाहिजे.
- सुलभा साळुंखे
सरपंच, खेडभोसे