सोलापूर - जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. याठिकाणी १७ पैकी १७ जागा भाजपा नेते राजन पाटील यांच्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नगराध्यक्षपदी राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील रिंगणात होत्या. त्यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र या निवडणुकीत थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता पाटील यांचीही नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनगर येथे राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला.
अनगर नगरपंचायतीवर बिनविरोध सत्ता काबीज केल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी उत्साहात रॅली काढली. या रॅलीत राजन पाटलांसह त्यांचे चिरंजीवही सहभागी झाले होते. त्यात राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आनंदाने बेभान झाल्याचे दिसून आले. यावेळी अनेक प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे होते. तेव्हा बाळराजे पाटील यांनी थेट कॅमेऱ्याच्या दिशेने बोट दाखवत अजित पवारांना आव्हान केले. "अजित पवार...सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाही..." असं बाळराजेंनी म्हटलं. सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या राज्याच्या राजकारणात अनगर नगरपंचायतीची चर्चा सुरू आहे. अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यामुळे ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक आहे. मागील अनेक वर्षापासून अनगर ग्रामपंचायतीवर राजन पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे. यावेळीही ही परंपरा कायम राखत १७ पैकी १७ जागा राजन पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाच्या आल्या. राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार असून अलीकडेच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती.
राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. या देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनावर किती दबाव आणि दडपण आणले जाते, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक आहे. या मोहोळ तालुक्यात कशापद्धतीने जंगलराज, गुंडाराज चालते याचे हे उदाहरण आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरायला जाताना ५०-५० पोलीस स्टेनगन, एके ४७ घेऊन पोलीस बंदोबस्त अर्ज भरावा लागतो अशी इथली परिस्थिती होते. हे जंगलराज मागील ७० वर्षापासून तालुक्यावर आहे. अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला आहे.
Web Summary : In Solapur's Anagar, BJP's Rajan Patil secured an uncontested Nagar Panchayat win. His son, Balraje, challenged Ajit Pawar, stating Anagar is not to be trifled with. The victory sparked celebrations amid allegations of undemocratic practices by NCP.
Web Summary : सोलापुर के अनगर में, भाजपा के राजन पाटिल ने निर्विरोध नगर पंचायत चुनाव जीता। उनके बेटे, बालराजे ने अजित पवार को चुनौती देते हुए कहा कि अनगर से खिलवाड़ नहीं किया जाना चाहिए। जीत के बाद एनसीपी द्वारा अलोकतांत्रिक प्रथाओं के आरोपों के बीच जश्न मनाया गया।