सोहराबुद्दिन प्रकरणी अधिकारी आरोपमुक्त
By Admin | Updated: August 20, 2016 01:50 IST2016-08-20T01:50:57+5:302016-08-20T01:50:57+5:30
सोहराबुद्दिन व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेंद्र के. अमीन यांची सबळ पुराव्यांअभावी

सोहराबुद्दिन प्रकरणी अधिकारी आरोपमुक्त
मुंबई : सोहराबुद्दिन व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेंद्र के. अमीन यांची सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्तता केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही विशेष सीबीआय न्यायालयाने २०१४मध्ये आरोपमुक्त केले. अमीन यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. एम. बी. गोसावी यांनी अमीन यांना आरोपमुक्त केले.
सीबीआयच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, सोहराबुद्दिन बनावट चकमकीच्या कटात अमीन सहभागी होते. सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसर बी यांची हत्या केल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी गुजरातच्या पोलिसांनी त्यांचे शव पुरले. त्या ठिकाणी अमीन उपस्थित होते. डॉक्टरकी सोडून पोलीस झालेले अमीन सध्या गुजरातमधील महीसागर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत.
सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातून आतापर्यंत अमित शाह, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, राजस्थानचे उद्योगपती मिल पटनी, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी. सी. पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक गीता जोहरी, पोलीस अधिकारी अभय चुंदासमा आणि अहमदाबाद जिल्ह्यातील सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी यशपाल चुंदासमा आणि अजय पटेल यांना आरोपमुक्त करण्यात आले आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, गुजरातच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने हैदराबादहून सांगलीला जात असलेल्या सोहराबुद्दिन शेखची गांधीनगर येथे बनावट चकमकीत हत्या केली. त्यानंतर त्याची पत्नी कौसर बीही गायब झाली. कौसर बी या घटनेची साक्षीदार असल्याने पोलिसांनी तिचीही हत्या केली. त्यानंतर या घटनेचा उरलेला एकमेव साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचीही पोलिसांनी २००६मध्ये बनावट चकमकीत हत्या केली.
खटला योग्यप्रकारे चालावा, यासाठी सीबीआयने हा खटला गुजरातहून मुंबईच्या न्यायालयात वर्ग करण्यात यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१२मध्ये हा खटला मुंबईच्या न्यायालयात वर्ग केला. (प्रतिनिधी)