समाजाने गौरवशाली इतिहास जपावा!
By Admin | Updated: December 28, 2014 01:23 IST2014-12-28T01:23:45+5:302014-12-28T01:23:45+5:30
जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट इतिहासजमा होतो़ म्हणून समाजाने आपला गौरवशाली इतिहास जपला पाहिजे,

समाजाने गौरवशाली इतिहास जपावा!
लातूर (स्वातंत्र्यसैनिक स्व. जगन्नाथराव कडतणे नगरी) : जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट इतिहासजमा होतो़ म्हणून समाजाने आपला गौरवशाली इतिहास जपला पाहिजे, असे प्रतिपादन शरदचंद्र गांधी यांनी केले.
महाराष्ट्र जैन इतिहास परिषद आणि सकल जैन समाज आयोजित दहाव्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात शनिवारी ते बोलत होते.
मंचावर संमेलनाध्यक्ष सुजाता शास्त्री, स्वागताध्यक्ष सुनील कोचेटा, मावळत्या संमेलनाध्यक्षा कविता तातेड, नलिनी जोशी, परिषदेचे अध्यक्ष गजकुमार शहा, ललित शहा, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण शहा, कार्याध्यक्ष डॉ. पी.पी. शहा, श्रेणिक अन्नदाते, सचिव डॉ. महावीर उदगीरकर, सुरेश जैन, संजय चोरडिया, शिवाजी क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेनशनाचे दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन झाले. पू. कनकमर मुनी यांनी औसा येथे निवासाला असताना लिहिलेल्या प्रसिद्ध ‘करकंडचरियू’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
शरदचंद्र गांधी म्हणाले, जैन समाज हा दाता समाज आहे. आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास अभ्यासला पाहिजे. भारतातील जैन समाजाचे स्थान हे एकूण लोकसंख्येच्या एक टक्केही नाही. परंतु जैनांनी समाजाला खूप दिले. पारशी समाजानंतर समाजाची सर्वाधिक काळजी जैन समाजाने वाहिली आहे. जैन समाजाने आता शाळा, रुग्णालयांच्या उभारणीकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचा पू. विद्यानंद महाराजांचा संदेश अंमलात आणायची गरज असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य गजकुमार शहा म्हणाले, जैन समाजाने व्यवहाराचा हिशोब व्यवस्थित लिहिला पण, समाजाचा इतिहास लिहिला नाही. याचे उत्तम उदाहरण शिकागोची धर्मपरिषद आहे. या परिषदेचे नाव जरी काढले तरी स्वामी विवेकानंद डोळ्यांसमोर येतात. परंतु याच परिषदेत बॅरिस्टर गांधी हे जैन धर्माचे साधक गेले होते. त्यांनी आपले ३० मिनिटांचे भाषण दिले. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन अनेकांनी जैन धर्माचा अभ्यास केला हे माहीतच नाही. रोज म्हटल्या जाणाऱ्या णमोकार मंत्रांचे लेखक कोण हे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे आपल्याच इतिहासाची नव्याने उजळणी करावी लागेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
संमेलनाध्यक्षांचे पॉवर पॉइंटद्वारे भाषण
अधिवेशनाच्या अध्यक्षा सुजाता शास्त्री यांनी हिंदीतून भाषण केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन शिलालेखांचा पट मांडला. अशा अधिवेशन वा परिषदेत संमेलनाध्यक्षांचे मनोगत पॉवर पॉइंट प्रेझेंटशनद्वारे व्यक्त करून त्यांनी तंत्रज्ञानाचा नवा संदेश दिलाच, शिवाय देशभरातील जैन शिलालेखांचे जैन आणि मानवी प्रगतीला कसे पोषक आहे हे सांगून जैन शिलालेख हे समृद्ध जैन इतिहासाचे चिरंतन प्रतीक असल्याचे सांगितले.