सामाजिक कार्यकर्ते असुरक्षितच
By Admin | Updated: February 21, 2015 00:14 IST2015-02-21T00:14:51+5:302015-02-21T00:14:51+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्षे झाले...हल्लेखोर अद्याप मोकाटच आहेत. तोपर्यंत कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला होतो.

सामाजिक कार्यकर्ते असुरक्षितच
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्षे झाले...हल्लेखोर अद्याप मोकाटच आहेत. तोपर्यंत कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला होतो. दोन्ही घटनांतील मारेकरी अद्याप सापडले नाहीत. या घटनांचा हेतू व मास्टरमार्इंड शोधण्यातही पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. परिवर्तनवादी विचार मांडणाऱ्या विचारपीठांपुढे हा एक नवा धोका निर्माण झाला आहे. या वेळी समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे, पोलिसांचे किमान कर्तव्य तर विचारवंतांच्या सुरक्षेची काळजी घेणे किमान त्यांच्याविषयी आस्था असणे ही समाजाचीही जबाबदारी. मात्र, पोलीस व समाजव्यवस्थेकडूनही ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये शुक्रवारी निराशाच पदरी पडली.
समाजात मान्यता असणाऱ्या विचारवंतांवर हल्ला होत असतानाही कोणी धावून पुढे आले नाही. संशयास्पद स्थितीत वावरत असतानाही कोणी हटकले नाही.
माणसामाणसांत भेद निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहा, आपला उद्धार आपल्याच हाती आहे, असे सांगणा-यांच्या विचारांवर घाला घातला जात आहे.
स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार, तरुणांना सामाजिक भान विचार सनातनी समाजाच्या पचनी पडत नाहीत. म्हणुनच की काय खून, खुनी हल्ला होतो.. पण विचार मरेल काय?
जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढ्यातील बिनीचे शिलेदार असलेल्या कार्यकतर््यांच्या जीवावर उठलेल्या धर्मांध शक्ती मोकाट फिरताहेत. डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यक्रमात धर्मवादाचे राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊन सत्याचा आग्रह धरणारे हकनाक बळी पडले जात आहेत ही खरी पुरोगामी महाराष्ट्रातील शोकांतिका म्हणावी लागेल.
अजित अभ्यंकर यांच्यावर हल्ला!
सकाळी साडेआठची वेळ... सहकारनगरच्या तुळशीबागवाले कॉलनीतील मोकळे रस्ते...प्रभात फेरीसाठी जात असलेले वृद्ध...तुरळक वाहने...अशातच पोहण्यासाठी सायकलवरुन जात असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस अजित अभ्यंकरांना मोटारसायकलवरुन आलेले दोन जण गाठतात. मोटारसायकल आडवी घालून त्यांच्यावर हल्ला केला जातो...त्यांच्यामध्ये झटापट होते...अभ्यंकर प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात...रस्त्यावरचे बघे मदतीला धावत नाहीत...संधी साधून हल्लेखोर दुचाकीवरुन पसार होतात आणि तेही पोलीस चौकीच्या समोरुन; कोणत्याही अडथळ्याशिवाय.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे अजित अभ्यंकर त्यांच्या घरामधून बाहेर पडले. सायकलवरुन जात असलेल्या अभ्यंकर यांच्या पाळतीवर असलेल्या दोघाजणांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. तुळशीबागवाले कॉलनीमध्ये त्यांना मोटारसायकल आडवी घालण्यात आली. त्यांच्यासोबत झटापट करुन मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला अभ्यंकरांनीही विरोध केला. घटनास्थळाच्या जवळच एक जोडपे बसलेले होते. समोरच्या बाजुला दोघेजण गप्पा मारत उभे होते. अभ्यंकर यांच्याशी झटापट सुरु असलेली पाहूनही कोणीही मदतीला धावले नाही. दरम्यान, एक दुचाकी चालक ही घटना पाहून थांबला. आपला हल्ला फसल्याचे पाहून हे हल्लेखोर गोळवलकर पथावरुन लक्ष्मीनगर पोलीस चौकीसमोरुन पसार झाले. ही घटना गुरुवारी प्रत्यक्षात घडली खरी; परंतु हा हल्ला अभ्यंकरांना इजा पोचवण्यासाठी नव्हता. तर निद्रिस्त सुरक्षा यंत्रणांना जाग आणण्यासाठी लोकमतने केलेले ‘स्टींग आॅपरेशन’ होते. हे स्टींग आॅपरेशन पुर्ण केल्यानंतर अभ्यंकरांना लोकमतच्या प्रतिनिधींनी भेटून नेमके कशासाठी केले याची माहिती दिली. अभ्यंकरांनीही मोठ्या मनाने लोकमतच्या प्रतिनिधींच्या या उपक्रमाचे कौतुक केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करणारे अभ्यंकर हे कडव्या टीकेसाठी प्रसिद्ध आहेत. विघटनवादी प्रवृत्तींकडून त्यांच्या कार्यालयावर तीन वेळा हल्लाही झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिसांची झोप झालीच नाही
या कालावधीदरम्यान तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, गोळवलकर गुरुजी पथावर पोलिसांची गस्त दिसली नाही. जवळच असलेल्या लक्ष्मीनगर पोलीस चौकीमधील पोलीस कर्मचारी नुकतेच झोपेमधून उठलेले होते. अभ्यंकरांच्या घरापासून अगदी जवळ असलेली चौकी सकाळीही निद्रिस्तच होती. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली तेव्हाही शनिवार पेठ पोलीस चौकीही अशाच पद्धतीने झोपलेल्या अवस्थेत होती.
पोलिसांनी माझ्या सुरक्षेबाबत विचारणा केलेली नाही. आमच्या पक्ष कार्यालयावर यापुर्वी तीन वेळा हल्ले झाले आहेत. त्याचाही तपास अजुनही लागलेला नाही. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस स्वत:हून काही उपाययोजना करतील अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे.
- अजित अभ्यंकर
हल्ला..! फंदात पडायला नको!
प्रभात रस्त्यावरील गजबजलेला परिसर....मात्र गल्ल्यांमध्ये सामसूम....ज्येष्ठ सामाजिक कार्यकतर््या विद्या बाळ आपल्या सोसायटीमधून बाहेर पडतात....अचानक एक स्कार्फ परिधान केलेली महिला पुढे येते...त्यांच्याशी धक्काबुक्कीचा प्रयत्न होतो. तिच्याबरोबरचा सहकारी दुचाकीवरून येऊन त्यांना पाडण्यासाठी मदत करतो... काय चाललं आहे? हे त्यांना कळत नाही... त्या थोड्याशा घाबरतात... शेजारी जाणारी महिला ही घटना पहातही असते. पण या फंदात आपण पडायचे नाही...अशा अविर्भावात ती निघून जाते. हे चित्र आहे शहरातील सामाजिक सुरक्षिततेचे व संवेदना बोथट झालेल्या समाजमनाचे.
स्त्रीवादी चळवळीच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण...अत्याचार, अन्याय यावर परखडपणे मत नोंदविताना दुसरीकडे पुरोगामी विचारसरणीमुळे शासनालाही जाब विचारण्याची धमक असलेल्या या विचारवंत महिला कार्यकर्र्त्याने सुरक्षेचे कवच आपल्याभोवती घेतलेले नाही आणि घेणारही नाही, असे सुनावले असले तरी त्यांच्या सुरक्षेचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. हल्लेखोर पुरूषच असतात, ही सर्वसाधारण मानसिकता समाजात विकसित झालेली असते, पण महिलाही या कृत्यामध्ये निश्चितच सहभागी होऊ शकतात, याचे उदाहरण म्हणजे विद्या बाळ यांच्यावर एका महिलेने केलेला हा प्राणघातक हल्ला. साधारणपणे महिलांकडे काहीशा संवेदनशील दृष्टीने पाहिले जाऊ शकते म्हणूनच त्यांचा सहभाग अशा हल्ल्यामध्ये केला जाऊ शकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र इथे महत्वाचा मुद्दा आहे तो बघ्याची भूमिका घेणा-या समाजाचा. एका महिलेवर हल्ला होत आहे हे दिसत असूनही कोणी पुढे येत नाहीत किंवा गाडीचा नंबर नोंदवून पोलिसांना सहकार्य करू शकत नाहीत. हीच दुर्देवी गोष्ट पहायला मिळाली.
समाजाच्या संवेदना मेलेल्याच...
शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कमला नेहरु पार्कमधील ट्रॅकवर अनेकांची गर्दी झालेली़ या वेळी अॅड. असीम सरोदे सहका-यांसोबत भांडारकर रोडच्या दिशेने नेहमीप्रमाणे फिरायला गेल होते. हेल्मेट घातलेले दोघे जण मोटारसायकलवरुन त्यांच्याभोवती संशयास्पदरित्या घिरट्या घालत होते. मात्र कोणाचेच लक्ष नाही पाहून मोटारसायकलवरील दोघांची हिंमत वाढते़
दोनतीनदा त्यांना घिरट्या घातल्यानंतर त्यांच्या मागोमाग जाऊन गाडी थांबवितात़ त्यातील एकजण पत्ताही विचारतो. अगदी हल्ला करण्यासारखी आणीबाणीची परिस्थिती. संशयही वाटावा, असा प्रकार नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद नाही. थोड्या वेळासाठी असीम सरोदे स्वत:च घाबरलेले दिसतात. कोण आहेत हे लोक... का पाठलाग करताहेत... काय हेतू त्यांचा असे नाना प्रश्न सरोदे यांच्या मनात आले असावेत. पण अखेरीस लोकतचे प्रतिनिधी आहेत हे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. ‘लोकमत’च्या टीमने केलेल्या स्टींग आॅपरेशअंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबत सुन्न करणा-या विविध बाबी समोर आल्या.
४मानवाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेले अॅड़ असीम सरोदे यांना गेल्या आठ- दहा दिवसांपासून धमकीचे फोन येत आहे. गृहराज्यमंत्री आणि पोलिसांनाही त्यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्यानंतरही पोलीसांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिल्याचे दिसून आले नाही. या भागात पोलीसांचे गस्तीपथकही फिरकत नसल्याचे उघडकीस आले.
४पोलिसांचे गुडमार्निंग स्कॉड असल्याचे व ते सकाळी गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत असल्याचे सांगितले जाते़ पण जवळपास तासाभरात तेही कमला नेहरु पार्क सारख्या सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची गर्दी असलेल्या ठिकाणी अथवा त्या रस्त्यावरुन एकही पोलिसांची गाडी अथवा मोटारसायकलवरील मार्शल जाताना आढळून आले नाही़ सरते शेवटी एक पोलिस अधिकारी सिगारेटच्या शोधात एका हातगाडीवर आले. अन सिगारेट नाही म्हटल्यावर वैतागत निघून गेले.
‘लोकमत’चा पुढाकार अभिनंदनीय
पोलिस यंत्रणेचा धाकच असा निर्माण झाला पाहिजे की समाजातील कुणावरीही हल्ला करण्याची हिंमत होता कामा नये, संपूर्ण समाजालाच सुरक्षित वाटले पाहिजे. त्याच भुमिकेतून आम्ही सुरक्षा नाकारत आहोत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात स्वाभाविकपणेच काळजीची भावना निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या दडशाहीला दबून आम्ही आमच्या दिनक्रमात कुठेही बदल केलेला नाही. संविधानाला अपेक्षित असलेल्या मुल्यव्यवस्थेच्या प्रसारासाठीच आम्ही झटत आहोत़
- सुभाष वारे, आम आदमी पार्टी
निर्भिडपणे स्वत:चे विचार मांडणाऱ्यांना पोलीसांनी स्वत होऊन बंदोबस्त द्यावा अशा प्रकारची मानसिकता आपल्याकडे नाही. सच्चे सामाजिक कार्यकर्ते पोलिस बंदोबस्ताची मागणीही करीत नाहीत. हे कार्यकर्ते, विचारवंत समाजाचे वैभव असतात. समाजाच्या वतीने त्यांना अभय मिळाले पाहिजे. मात्र समाज सुद्धा आत्मकेंद्रीत होत चालला आहे. कार्यकर्त्यांवर हल्ले करणारे खरे तर सहज पकडले जाऊ शकतात. फक्त समाजाची साथ हवी. वर्तमानपत्रे समाजाला प्रतिक्रिया व्यक्त करण्याविषयी शिकवतात. ‘लोकमत’ने तशी लोकांकडून तशी प्रतिक्रिया व्यक्त व्हाव्यात यासाठी पुढाकार घेतला हे अभिनंदनीय आहे. - डॉ. कुमार सप्तर्षी, युवक क्रांती दल
भरदिवसा गोळीबार अन् बघे पुणेकर
वे ळ संध्याकाळचे साडेसहा... पर्यावरणवादी डॉ. विश्वंभर चौधरी कार्यालयातील कामे संपवून इमारतीतून खाली उतरतात... मोबाईलवर बोलता बोलता ते इमारतीच्या पार्किं गमधून बाहेर येतात... तेवढयात गोळीबाराचा आवाज येतो... काही समजण्याच्या आत डॉ. चौधरी जमिनीवर पडतात अन् हल्लेखोर पसार झालेला असतो... एवढा मोठा हल्ला होत असतानाही आजूबाजूला रस्त्यावर असलेले कोणीही व्यक्ती समोर येत नाही... काही फक्त उभे राहून पाहत असतात... हे चित्र आहे पुण्यासारख्या सुसंस्कृत समाजाचे...
पुण्यात डॉ. नरेंद्र दभोलकरांवर १७ महिन्यांपूर्वी झालेला हल्ला असो की कोल्हापूरमध्ये गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला... पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असतानाही त्यामधून राज्यशासन, पोलीस आणि समाजाने कोणताही धडा घेतलेला नाही. याचा प्रत्यय आज डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला होताना लांब उभे राहून फक्त बघ्याची भूमिका घेणारे नागरिक यातून दिसून आला. काही तर या घटनेकडे कानाडोळा करीत निघून गेले. जवळच्या सुरक्षा रक्षकांनी तर आवाज येऊनही पाहण्याची तसदीसुध्दा घेतली नाही.
४डॉ. चौधरी हे नेहमीप्रमाणे आपले काम संपवून कार्यालयातून बाहेर पडताना अगदी वर्दळीच्या ठिकाणी लॉ कॉलेज रस्त्यावरही असा हल्ला होऊ शकते, याचा प्रयत्न या घटनेने दिला आहे.
४आम्ही आमच्या भागात दररोज गस्त घालातो, असे सांगणारे पोलीस मात्र दिवसातून एकदाही अनेक भागांमध्ये दिसून येत नाही. असेच चित्र डॉ. चौधरी यांच्या कार्यालयाच्या परिसरातही दिसून आले.
४हल्लेखोरांना अशा व्यक्तींच्या जीवनातील दिनचर्येवर व्यवस्थित लक्ष ठेवता येणे सोपे असून एका दिवशी त्यांच्यावर हल्ला करणेही अगदी सोपे असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.