पन्हाळा चित्रपटातून सामाजिक संदेश : भोसले
By Admin | Updated: November 24, 2014 23:57 IST2014-11-24T23:18:36+5:302014-11-24T23:57:27+5:30
‘इफ्फी’त माहिती : लवकरच होणार प्रदर्शित

पन्हाळा चित्रपटातून सामाजिक संदेश : भोसले
संदीप आडनाईक - पणजी -‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या सारखा चित्रपट असो, की ‘देवयानी’सारखी मालिका असो, आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या नागेश भोसले यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावर चित्रपट निर्माण केला आहे.
या चित्रपटातून केवळ मनोरंजन नव्हे, तर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता नागेश भोसले यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या नागेश भोसले यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. देवयानी मालिका सोडल्यानंतर काही काळ विश्रांती घेण्यासाठी पन्हाळगडावर गेलो होतो.
तेथेच या चित्रपटाचा विषय सुचल्याचे भोसले म्हणाले. या चित्रपटासाठी कोल्हापूरचेच लेखक विद्यासागर अध्यापक यांनी पटकथा लिहिली आहे. विशेष म्हणजे मकरंद देशपांडे, संग्राम साळवी, अमृता संत, समिधा गुरू, डॉ. राज होळकर आणि नागेश भोसले हे चित्रपटात भूमिका करत आहेत.
या चित्रपटाचा विषय हा पन्हाळ्याभोवती गुंफलेला आहे. चित्रपटाचे चित्रीकरणही पन्हाळ्यावरच केले असून,
अवघ्या १७ दिवसांत हा चित्रपट पूर्ण केला आहे.
पन्हाळ्याला ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ आहेत. स्थानिक पर्यटन, रोजगार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या विस्मरणासोबतच आधुनिक युगात मानवी नातेसंबंधही तुटत चालले आहेत, याविषयी हा चित्रपट भाष्य करतो.
स्वच्छ आणि निर्मळ हवा, नयनरम्य वातावरण, जबरदस्त अदाकारी तसेच काळजाला हात घालणाऱ्या प्रसंगाचे चित्रण या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण अमरेंद्र भोसले यांनी केले आहे. चित्रपटात एक गाणेही आहे, पण शीर्षकगीत असेल.
‘पन्हाळा’ हा पहिला पश्चिम महाराष्ट्रातील चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर येतो आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून तो पावणेदोन तासाचा आहे. चित्रपटात मुख्य कलाकारांशिवाय बहुतेक कलाकार स्थानिक आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.