सुधारणावादी व्यक्तींची नक्षल्यांकडून मुस्कटदाबी
By Admin | Updated: July 27, 2014 01:24 IST2014-07-27T01:24:04+5:302014-07-27T01:24:04+5:30
गोरगरिब जनतेचे भले करण्याची भाषा वापरणारे नक्षलवादी सुशिक्षित आणि सुधारणावादी व्यक्तींची मुस्कटदाबी करीत आहे. मनाप्रमाणे ऐकत नसेल तर त्याला पोलिसांचा खबऱ्या ठरवून त्याची हत्या करतात.

सुधारणावादी व्यक्तींची नक्षल्यांकडून मुस्कटदाबी
गोरगरिबांची कुचंबना : धाडसी मंगला अजमेरचे कथन
नागपूर : गोरगरिब जनतेचे भले करण्याची भाषा वापरणारे नक्षलवादी सुशिक्षित आणि सुधारणावादी व्यक्तींची मुस्कटदाबी करीत आहे. मनाप्रमाणे ऐकत नसेल तर त्याला पोलिसांचा खबऱ्या ठरवून त्याची हत्या करतात. गावाच्या विकासाची चर्चा करतो म्हणूनच आपल्या पतीची नक्षलवाद्यांनी हत्या केली, अशी माहिती मंगला राजू अजमेर या आदिवासी महिलेने आज पत्रकारांना दिली. नक्षल्यांप्रमाणेच विकासाचा दावा करणाऱ्या सरकारचाही फोलपणा मंगला यांनी उघड केला.
जानेवारी २०१४ मध्ये नक्षलग्रस्त भागात शोधयात्रा काढणाऱ्या आणि या भागातील आदिवासी, गोरगरिब जनतेच्या व्यथा समजून घेणाऱ्या शोधयात्रेतील काही जणांनी ‘भूमकाल संघटन‘ काढले आहे. नक्षलवाद्यांचा वैचारिक विरोध करून या चळवळीचा फोलपणा उघड करण्याचा संकल्प घेणाऱ्या भूमकाल संघटनने आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. मंगला अजमेर या संघटनेच्या सदस्य आहेत. डोळ्यादेखत पती गमावणाऱ्या आणि याचवेळी नक्षल्यांना गोळ्या मारा असे आवाहन करणाऱ्या धाडसी मंगला अजमेर नक्षल्यांच्या क्रूरपणाचा परिचय सर्वांना व्हावा या उद्देशाने पत्रकारांपुढे आल्या. त्यांना अक्षय (वय १५), अजय (वय १२) आणि पवन (वय ९) अशी तीन मुले आहेत. त्या आपल्या पती आणि मुलांसोबत गडचिरोलीतील किष्टापूर गावात राहायच्या. पतीचे छोटेसे किराणा दुकान होते. ४३५ लोकसंख्येच्या या गावात येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या किराणा दुकानात यायची. पोलीसही बसायचे. गावाचा विकास झाला पाहिजे. रस्ते, लाईट आले पाहिजे. शाळा अन् आरोग्य सेवाही किष्टापुरात यावी, असे राजू अजमेरचे प्रयत्न होते. नक्षल्यांना ते नको होते. त्यामुळे ते वारंवार धमक्या द्यायचे. २६ जानेवारीला पतीच्या पुढाकाराने गावात झेंडावंदनाचा (गणराज्य दिनाचा) कार्यक्रम झाला. परिणामी नक्षलवाद्यांनी दुसऱ्याच दिवशी (२७ जानेवारी) राजू अजमेर आणि अन्य एक अशा दोघांना गावकऱ्यांसमोर गोळ्या घालून ठार मारले.
यावेळी काही नक्षल्यांनी आपल्याला पकडून ठेवले होते. ‘तुम्ही गोरगरिबांच्या हिताच्या गोष्टी करता. आम्ही गरीब आहोत, आमचे घर का उद्ध्वस्त करता‘, असा प्रश्न मंगला यांनी नक्षलवाद्यांना विचारला. यावर ‘तुलाही गोळ्या घालू का‘, असे नक्षल्यांनी विचारले. मंगलाने त्यांना शिव्याशाप देत ‘हिंमत असेल तर घाला गोळ्या‘ असे म्हणत आव्हान दिले. नक्षल्यांनी तिला सोडून देत गावातून पळ काढला. या घटनेमुळे अजमेर कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. वृध्द सासू-सासरे बाजूला सहा किलोमीटर अंतरावर राहायला आहे. कर्ता मुलगा गेल्यामुळे जगायचे कसे, असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. धाडसी मंगलाने त्या गावात छोटेसे किराणा दुकान सुरू केले.
मुलांचे शिक्षण आणि त्यांच्यासकट सासू-सासऱ्यांच्या उदरभरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी धाडसी मंगला प्रयत्न करते. गावातील आशा कार्यकर्ती म्हणूनही सेवा देते.
यावेळी भूमकाल संघटनेचे सहसंयोजक अरविंद सोहनी यांनीही नक्षल्यांचा फोलपणा उघड केला. संघटनेचे अध्यक्ष श्याम पांढरीपांडे, संयोजक दत्ता शिर्के, रश्मी पारस्कर तसेच मंगला यांचे नातेवाईक पुनाराम चव्हाण उपस्थित होते. त्यांनीही गडचिरोलीतील भयाण वास्तवावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)