सर्कशीचा मालक चालवितोय छोटा हत्ती

By Admin | Updated: February 12, 2015 00:36 IST2015-02-11T22:33:05+5:302015-02-12T00:36:57+5:30

दुष्काळाने ग्रह फिरले : सहाखांबी तंबू मालकाची दर्दभरी कहाणी; खऱ्याखुऱ्या हत्तीच्या उरल्या फक्त आठवणी --लोकमत विशेष...

The small elephant running the owner of the circus | सर्कशीचा मालक चालवितोय छोटा हत्ती

सर्कशीचा मालक चालवितोय छोटा हत्ती

प्रदीप यादव - सातारा  -पंधरा वाघ, पाच सिंह, पंधरा हत्ती, वीस घोडे, नानाविध जातींचे पक्षी, कुत्री अन् हजार ते दीड हजार कामगारांसह शंभर ट्रक साहित्य अशा शाही लवाजम्यासह सहा खांबी सर्कसचा डामडौल ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. नुसता अनुभवलाच नाही तर मालक म्हणून मिरवलाही. पण १९७२ चा दुष्काळ जणू काळ म्हणून आला अन् सर्कशीला उतरती कळा लागली. एवढं मोठं कुटुंब चालविताना कर्ज वाढलं अन् देणं चुकतं करता-करता सर्कस हातातून सुटली. नियतीनं होत्याचं नव्हतं झालं अन् सर्कशीतल्या हत्तींना सांभाळणाऱ्या हातात ‘छोट्या हत्ती’चं स्टिअरिंग आलं.
एखाद्या सिनेमाला शोभेल अशी ही कथा वाटत असली तरी ती अगदी खरी आहे. साताऱ्यात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘छोटा हत्ती’ चालविणाऱ्या मुनीर मेहत्तर यांच्याकडे पाहिले तर एकेकाळी मालकीच्या सर्कशीत हत्ती खेळविणारा माणूस तो हाच, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही.
एकेकाळी आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकावर असणारी ‘जी. ए. सर्कस आॅफ बॉम्बे’ या सर्कशीनं जवळपास ७० वर्षे भारतभर फिरून लोकांचे मनोरंजन केले. शाही डामडौल असलेल्या या सर्कशीला दुष्काळाचा फटका बसला अन् हळूहळू आर्थिक स्थिती ढासळू लागली. सर्कशीच्या सुवर्णकाळाविषयी मुनीर मेहत्तर सांगतात... ‘सन १९१० मध्ये आजोबा याकूब मेहत्तर यांनी सर्कस सुरू केली. एक-एक करत प्राणी विकत घेतले. ऐंशी-नव्वद प्राणी, विविध पक्षी, एक हजार कर्मचारी आणि शंभर ट्रक साहित्य असा सर्कशीचा डौल होता. व्याप वाढल्यामुळे तो सांभाळायला भावाच्या मुलांना बरोबर घेतले. संपूर्ण भारतभर शो केले. याकूब मेहत्तर हे सर्कस जगतातील मोठं नाव होतं.
आजोबांच्या पश्चात १९५० नंतर वडील हाजी रज्जाक मेहत्तर यांनी सर्कस चालविली. शाळेला सुटी मिळाली की आम्ही सर्कशीबरोबर जायचो. मालक म्हणून आमचा शाही थाट होता. आलिशान हॉटेलात राहायचो. दिमतीला नोकर-चाकर होते. पैशाची कमतरता नव्हती...’ उत्साहानं सर्कशीच्या त्या दिवसांबद्दल सांगता-सांगता १९७२ च्या आठवणीने मुनीर मेहत्तर यांचा चेहरा निराश झाला.
दुष्काळानं सहा खांबी सर्कशीचा तंबू कसा ढासळत गेला, याबद्दल ते बोलत होते. ‘१९७९ मध्ये बारावीनंतर पुढील शिक्षण घेत मी सर्कशीबरोबर राहून हत्ती सांभाळू लागलो. सर्कशीत जीव रमत असतानाच कर्जाचा बोजा वाढत चाललेला. दुष्काळामुळं लोक सर्कस पाहायला येत नव्हते. वीस-पंचवीस लोकांसाठी सर्कस सुरू करावी लागे. कलाकार, कामगारांचे पगार थकले. प्राण्यांसह कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली. देणं भागविताना सर्कस हातातून निसटली. हत्ती सांभाळत बीएस्सी केलं; पण काळाच्या ओघात ‘तो’ हत्ती गेला अन् हाती ‘छोटा हत्ती’ आला.’


एक हजारापासून सुरुवात
व्यवसायासाठी आजोबा सांगलीला होते. त्यांनी एका सोनाराकडे एक गाठोडं देऊन एक हजार रुपयांचं कर्ज घेतलं. त्या पैशातून सिनेमा प्रोजेक्टर घेतला. त्यानंतर सर्कस सुरु करण्यासाठी एक एक प्राणी विकत घेऊन पसारा वाढविला अन् आशिया खंडातील तिसऱ्या नंबरची ‘जी. ए. सर्कस आॅफ बॉम्बे’ सर्कस उभी राहिली.


शेवटचा शो  इस्लामपुरात
‘आर्थिक स्थिती ढासळ्यामुळे सर्कस बंद पडण्याच्या मार्गावर आली होती. कर्ज वाढले होते. मला आठवतेय १९८० मध्ये इस्लामपुरात आम्ही शेवटचा शो केला होता,’ अशी आठवण मुनीर सांगतात.


असाही विश्वास..
आजोबांनी ज्या सोनाराकडून एक हजाराचं कर्ज घेतलं, ते परत करण्यासाठी जेव्हा आजोबा सोनाराकडे गेले, तेव्हा आजोबांनी सोनाराला विचारलं, ‘मी दिलेल्या गाठोड्यात काय आहे बघितलं का?’ त्यावर सोनार म्हणाला, ‘गहाण ठेवलेल्या वस्तूपेक्षा माझा तुझ्यावर विश्वास होता.’


सरदारजींकडे सर्कस सुपूर्द

सर्कशीतील एक सरदार दाम्पत्य काम करीत होते. पगारापोटी त्यांना मोठी रक्कम द्यावी लागणार होती. वडिलांनी सर्कस त्यांच्या हाती सोपविली. काही वर्षे ते आम्हाला पैसे पाठवत होते.

भटारखान्यात शिजायचे रोज
एका लग्नाचे जेवण
सर्कस चालविण्यासाठी हजार कर्मचारी राबायचे. या सर्वांसाठी रोज दोन वेळचे जेवण भटारखान्यात शिजायचे. एका लग्नासाठी लागणारे जेवण रोज बनवावे लागायचे.

Web Title: The small elephant running the owner of the circus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.