दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:13 IST2025-11-12T13:11:56+5:302025-11-12T13:13:34+5:30
ATS Raid Mumbra: मुंब्र्यातील उर्दू शिक्षक इब्राहिम अबीदीवर अल-कायदा (AQIS) संबंधांमुळे ATS चा छापा. हा शिक्षक तरुणांना आणि मुलांना कट्टरपंथी बनवत असल्याचा संशय आहे. पुणे AQIS प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत!

दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने भारतात खोलवर पाळेमुळे रोवल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटापूर्वी जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली होती. तिसराही ताब्यात आला होता. परंतू, चौथ्या डॉक्टरने तयार असलेल्या स्फोटकांचा दिल्लीत नेऊन स्फोट घडवून आणला होता. आता मुंब्र्यातून मशीदीमध्ये उर्दू शिकविणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या शिक्षकाचे अल कायदाशी संबंध असून तो लहान मुलांना, समाजातील उच्चभ्रू, उच्चशिक्षितांना दहशतवाद्यांचा स्लिपर सेल बनून कट्टर बनविण्यासाठी ब्रेन वॉश करत असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे हे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील इब्राहिम अबीदी नावाच्या एका उर्दू शिक्षकाच्या घरावर बुधवारी एटीएसने छापा टाकला. अबीदी हा मुंब्र्यात भाड्याच्या घरात राहत असे आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत उर्दू शिकवत असे. मात्र, या 'साध्या' जीवनाआड त्याचे संबंध अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी असल्याचा एटीएसला संशय आहे.
शिक्षण की कट्टरता?
इब्राहिम अबीदी हा 'व्हाईट-कॉलर' लोकांना आणि मुलांना कट्टरपंथी विचारधारेकडे वळवण्याचे काम करत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई पुणे AQIS प्रकरणाशी जोडलेली आहे. याच प्रकरणात यापूर्वी पुणे येथून झुबेर इलियास हंगरगेकर नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली होती. यानंतर हे धागेदोरे सापडले आहेत.
ATS च्या तपासात असे उघड झाले आहे की, अटक केलेला इंजिनिअर झुबेर हंगरगेकर हा मुंब्र्यातील याच शिक्षकाच्या घरी झालेल्या एका गुप्त बैठकीत सहभागी झाला होता. इतकेच नव्हे, तर झुबेरच्या जुन्या फोनमधून ओसामा बिन लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर तसेच 'अल-कायदा'शी संबंधित गोपनीय कागदपत्रे आणि 'इंस्पायर' नावाचे एक मासिक जप्त करण्यात आले आहे, ज्यात बॉम्ब बनवण्याची माहिती होती.
ATS ने इब्राहिम अबीदीच्या मुंब्रा आणि कुर्ला (दुसऱ्या पत्नीचे घर) येथील दोन्ही ठिकाणांची झडती घेतली असून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या शिक्षकाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांनी मुंबई आणि परिसरात आपले जाळे किती खोलवर पसरवले आहे, याचा तपास ATS युद्धपातळीवर करत आहे.