उस्मानाबादमधील मांजरा धरण ओव्हर-फ्लो, धरणाचे उघडले सहा दरवाजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 09:41 IST2017-09-22T08:54:38+5:302017-09-22T09:41:49+5:30
बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प तुडुंब भरला असून धरणाचे सहा दरवाजे शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडण्यात आले आहेत.

उस्मानाबादमधील मांजरा धरण ओव्हर-फ्लो, धरणाचे उघडले सहा दरवाजे
अंबाजोगाई, दि. 22 - बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प तुडुंब भरला असून धरणाचे सहा दरवाजे शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडण्यात आले आहेत. मांजरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
धरणाची साठवण क्षमता 224 द.ल.घ.मी. आहे. गुरुवारी सकाळपर्यंत यात 211 द.ल.घ.मी.साठा होता. दुपारनंतर धरणात पाण्याची आवक वाढली आणि शुक्रवारी (22 सप्टेंबर) पहाटेपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 6 वाजता धरणाचे सहा दरवाजे २५ सेंमीपर्यंत उघडण्यात आले. यातून सध्या १५० घनमीटर प्रती सेकंद दराने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मांजराचे दरवाजे उघडले जाण्याची आजवरची ही चौदावी वेळ आहे. मागील वर्षी सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा योग आला होता. यंदाही निसर्गाने भरभरून दान दिल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी दरवाजे उघडण्याचा सुखावह प्रसंग अनुभवयास मिळत आहे.