ड्रायव्हिगसाठी सिम्युलेटर
By Admin | Updated: August 7, 2014 01:03 IST2014-08-07T01:03:43+5:302014-08-07T01:03:43+5:30
घाटाचा रस्ता, हायवे, पाऊस, बोगदा, कच्चा रस्ता आणि एकूणच सर्व रस्त्यांवर गाडी चालविताना काय काळजी घ्यावी? याचे प्रशिक्षण देण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलले आहे. एसटीच्या

ड्रायव्हिगसाठी सिम्युलेटर
प्रशिक्षित चालक घडणार : राज्यातील पहिली ‘सिम्युलेटर’ नागपुरात दाखल
दयानंद पाईकराव - नागपूर
घाटाचा रस्ता, हायवे, पाऊस, बोगदा, कच्चा रस्ता आणि एकूणच सर्व रस्त्यांवर गाडी चालविताना काय काळजी घ्यावी? याचे प्रशिक्षण देण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलले आहे. एसटीच्या चालकांना आगामी आठ दिवसांत हे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. परंतु हे प्रशिक्षण एखादा प्रशिक्षित चालक देणार नसून हे प्रशिक्षण देणार आहे ‘सिम्युलेटर’ नावाची मशीन. होय, राज्यातील पहिली ‘सिम्युलेटर’ मशीन एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयात दाखल झाली आहे.
चारचाकी वाहन चालविण्यासाठी पारंपरिक पद्धतीनुसार सर्व जण ‘ड्रायव्हिंग स्कूल’मध्ये प्रवेश घेतात. मात्र, आता एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील ‘टेक्नो सीम ड्रायव्हिंग सिम्युलेटर’ ही मशीनच एसटी बस चालविण्याचे धडे देणार आहे. वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाईल असोसिएशन मुंबईने (डब्ल्यूआयएए) एसटीशी सामंजस्य करार करून एसटीच्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयस्तरावर ‘सिम्युलेटर’ उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यापैकी पहिले ‘सिम्युलेटर’ नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयात दाखल झाले आहे. यात यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ ‘डब्ल्यूआयएए’चे राहणार असून, एसटीला फक्त जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. वाहन चालविताना चालकाला पाऊस, घाटाचा रस्ता, चढ-उतार, हायवे, बोगदा, कच्चा रस्ता अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून वाहन चालवावे लागते. या परिस्थितीत वाहन कसे चालवावे, याचे अचूक प्रशिक्षण ही मशीन देणार आहे.
चालक या मशीनच्या ‘ड्रायव्हिंग सीट’वर बसल्यानंतर तो कसे वाहन चालवितो याचे संगणकावर रेकॉर्डिंग होईल. चालकाने चूक केली की वाहन बंद पडेल. चालकाचे वाहन चालविणे संपल्यानंतर त्याचा अहवाल निघून चालकाच्या चुका कळतील. विभाग नियंत्रक कार्यालयातील या मशीनवर खाजगी आणि एसटीचे चालक दोघांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. एसटीच्या चालकाला १०० रुपये आकारण्यात येतील. तर खाजगी चालकाकडून किती पैसे आकारायचे, याचा निर्णय ‘डब्ल्यूआयएए’ घेणार आहे. त्यामुळे एसटीच्या चालकांकडून होणारे अपघाताचे प्रमाण शून्यावर येऊन एसटीचा मोठा महसूल वाचणार आहे.