बिले थकविणाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
By Admin | Updated: January 18, 2015 01:22 IST2015-01-18T01:22:58+5:302015-01-18T01:22:58+5:30
आदेश देऊनही ही बिले तयार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण मंडळाच्या तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

बिले थकविणाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
पुणे : महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांमधील मुलांची वाहतूक करणाऱ्या तब्बल २३ रिक्षाचालकांची थकीत बिले देण्याचे आदेश देऊनही ही बिले तयार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण मंडळाच्या तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
दरम्यान, या रखडलेल्या बिलांसाठी पुणे जिल्हा शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने शनिवारी थकीत बिलांसाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यात रिक्षाचालक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होती. या वेळी या नागरिकांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत येत्या सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रिक्षाचालकांना थकीत बिले देण्याचे आश्वासन शिक्षणप्रमुख बबन दहिफळे यांनी दिले.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्याच्या हेतूने महापालिका शिक्षण मंडळाने हडपसर, येरवडा आणि दत्तवाडी येथे क्रीडा निकेतन शाळा सुरू केल्या आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत ही शाळा भरते. सकाळचा व्यायाम आणि इतर प्रशिक्षणासाठी शहराच्या कानाकोपऱ्यांतून विद्यार्थी येतात. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी स्कूल बस आणि रिक्षांची व्यवस्था केली आहे. मात्र, शिक्षण मंडळाने जुलै ते डिसेंबर या महिन्यांचे तब्बल आठ लाख रुपयांची बिले थकविली आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांनी १५ दिवसांपासून बंद पुकारला असून, विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडणे बंद केले आहे. ही बिले तत्काळ मिळावीत यासाठी आंदोलन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्याने कारवाई
या प्रकरणी महापौर दतात्रय धनकवडे यांनी बैठक घेतली. या बैठकीस दहिफळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, संघटनेचे अध्यक्ष संपत पाचरणे यांच्यासह शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी, शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते. या वेळी ही जुलै ते आॅक्टोबरपर्यंतची बिले तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मंडळाकडून ती कार्यवाही झाली नसल्याचे जगताप यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. या वेळी दहिफळे यांना काहीच उत्तर देता आले नाही. तसेच ही बिले मागील ९ जानेवारीला पालिकेकडे आल्याचेही जगताप यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दुपारी मंडळात जाऊन जगताप यांनी तपासणी केली असता, तीन कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे दिसून आले असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याÞचे जगताप यांनी सांगितले.