सात दिवसांत धक्कादायक खुलासे
By Admin | Updated: September 9, 2014 01:15 IST2014-09-09T01:15:48+5:302014-09-09T01:15:48+5:30
केवळ लकडगंज परिसरच नव्हे तर नागपूरकरांना थरारून सोडणाऱ्या युग मुकेश चांडक हत्याकांडाला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोघांनी

सात दिवसांत धक्कादायक खुलासे
झटपट श्रीमंतीचा हव्यास : आरोपींकडून दिशाभूल
नागपूर : केवळ लकडगंज परिसरच नव्हे तर नागपूरकरांना थरारून सोडणाऱ्या युग मुकेश चांडक हत्याकांडाला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोघांनी गेल्या सोमवारी (१ सप्टें. २०१४) निरागस युगचे अपहरण करून त्याची हत्या केली होती.
२ सप्टेंबरला रात्री या थरारक प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी राजेश आणि अरविंदला अटक केली. सध्या ते लकडगंज पोलिसांच्या कस्टडीत आहेत.या प्रकरणाचा सूत्रधार राजेश दवारे याने गेल्या सात दिवसात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. ते पाहता तो नवखा गुन्हेगार आहे, यावर पोलिसांचा विश्वासच बसत नाही. झटपट श्रीमंतीचा हव्यास बाळगून असणारा राजेश धन्नालाल दवारे (वय १९) याचे वय आणि शरीरयष्टी बघता तो एवढे थरारक हत्याकांड घडवू शकतो, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. पोलिसांनी त्याला प्रारंभी ताब्यात घेतले तेव्हा सहज चौकशीचा भाग म्हणून पोलिसांनी त्याला विचारपूस केली. मात्र, ज्याला विचारपूस करून पोलिसांनी काही वेळेनंतर मोकळे केले, तो एवढा क्रूर असेल आणि तो इतके भयंकर कटकारस्थान रचू शकतो, याची पोलिसांनी कल्पनाच केली नव्हती. मात्र, त्याच्या सैतानी विचाराने पोलिसही चक्रावले आहेत. त्यामुळे एखाद्या सराईत गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, त्याच पद्धतीने राजेशलाही विचारणा केली जाते.
खंडणी कशी उकळायची ?
चांडक यांच्याकडून युगच्या बदल्यात करोडोंची खंडणी मिळेलच,असा ठाम विश्वास राजेश दवारेला होता. त्यामुळे त्याने युगच्या अपहरणाचा, अपहरण केल्यानंतर खंडणी कशी मागायची त्याचा आणि खंडणी देणारा काय म्हणू शकतो, त्याचाही विचार करून ठेवला होता.
म्हणूनच १ सप्टेंबरला दुपारी ३.३० पासूनच युग शाळेतून आला की नाही, त्याची राजेशने डॉ. चांडक यांच्या घरी आणि क्लिनिकमध्ये फोन करून शहानिशा केली होती.
अपहरण केल्यानंतर जास्त वेळ युगला सोबत ठेवणे शक्य नव्हते, हे तो जाणून होता. कारण, युग चंचल स्वभावाचा होता. त्याने आरडाओरड केली असती, पळून जाण्याचेही प्रयत्न केले असते, त्यामुळे युगची हत्या करण्याचा कट त्याने पक्का केला होता.
हत्या करून खंडणी मागितल्यानंतर डॉ. चांडक हे युग ताब्यात असल्याचा पुरावा मागतील, तर त्यांची कशी दिशाभूल करायची, याचीही योजना त्याने बनविली होती. म्हणूनच युगची हत्या केल्यानंतर त्याचा शर्ट राजेशने काढून घेतला होता. हा शर्ट दाखवायचा आणि डॉ. मुकेश चांडक यांच्याकडून खंडणी वसूल करायची, अशी त्याची योजना होती. खंडणी घेताना पकडले जाण्याचा धोका होता. म्हणून तो डॉ. चांडक यांना धावत्या ट्रेनमधून नोटांची बॅग निर्जन ठिकाणी फेकायला सांगणार होता. ट्रेन समोर निघून जाईल आणि आपल्याला झटक्यात पाच-दहा कोटी रुपये मिळतील, कुणाला आपण दिसणारही नाही, असा त्याचा अंदाज होता. मात्र, घटनेच्या काही वेळेतच त्याला पोलीस ठाण्यातून फोन आले. त्यामुळे त्याचे कारस्थान फसले. म्हणूनच त्याने युगचा शर्ट रस्त्यातच फेकून दिला. या प्रकरणातील आरोपी अरविंद सिंग हा राजेशने पैशाचे आमिष दाखविल्यामुळे गुन्ह्यात सहभागी झाल्याचे सांगतो. तर, राजेश पोलिसांना प्रत्येक प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर देऊन पोलिसांची दिशाभूल करतो. अनेकदा प्रकृती बिघडल्याचेही नाटक करतो, नंतर स्वत:च चुकीची माहिती देतो. त्याच्या या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असून, त्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.(प्रतिनिधी)