धक्कादायक...४५ टक्के सांगलीकर मानसिक समस्याग्रस्त!
By Admin | Updated: October 9, 2014 23:48 IST2014-10-09T23:35:07+5:302014-10-09T23:48:10+5:30
शहरातील स्थिती : आर्थिक ओढाताण, नैराश्य, कौटुंबिक वादविवाद, काळजीत वाढ झाल्याचे परिणाम

धक्कादायक...४५ टक्के सांगलीकर मानसिक समस्याग्रस्त!
नरेंद्र रानडे- सांगली -शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याकडे आपण तितकेसे गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी कित्येकजण मानसिक आजाराबाबत अनभिज्ञ असतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. मानसिक आजारांबाबत विज्ञान युगातही बहुतेकांचा कल वैद्यकीय सल्ला न घेता इतर अनावश्यक उपचार करण्याकडे असतो. सध्या महापालिका क्षेत्रात सुमारे ४५ टक्के नागरिक हे मानसिक समस्यांनी त्रस्त असल्याचा निष्कर्ष शहरातील ‘आकार फाऊंडेशन’ या सामाजिक संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.
जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत आपले स्थान टिकवायचे असेल, तर प्रत्येकाला तणावातून जावेच लागते. हा तणाव कमी करण्यासाठी कितीजण खंबीरपणे प्रयत्न करतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु बहुतांशीजण त्याचा सामना करण्याऐवजी त्यापासून दूर पळणेच श्रेयस्कर मानतात. हा देखील एक प्रकारचा मानसिक रोगच आहे. आजकाल अनेकांचा वेळ एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा सोशल मीडियावर सर्फिंग करण्यातच जातो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. परिणामी त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन वागण्यावर होतो. साहजिकच ताण-तणावात वाढ होते.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपध्दती असताना घरात सुसंवाद असायचा. कुटुंबासाठी लागणाऱ्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जायच्या. पण सध्या विभक्त कुटुंब पध्दतीमुळे व वाढत्या महागाईमुळे कुटुंबात होणाऱ्या विसंवादाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
यासह अनेक कारणांमुळे माणसांचे मानसिक आरोग्य निरोगी रहात नसल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती बदलण्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करुन आपले मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे.
लक्षणे
चिडचिडेपणा करणे.
नैराश्य टाळण्यासाठी मादक द्रव्यांचे सेवन.
आपले म्हणणे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणे
सतत नकारात्मक विचार करणे.
मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. संकटांशी सामना कसा करावा याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले पाहिजे. तर आत्महत्या, घटस्फोट आदी प्रमाणात निश्चित घट होईल.
- डॉ. प्रदीप पाटील,
मानसोपचारतज्ज्ञ
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा सकारात्मक परिणाम होतो. योगाद्वारे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे सोयीचे जाते. साहजिकच मानसिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे.
-श्याम वैद्य,
पतंजली योग समिती, सांगली..
मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय?
धकाधकीच्या जीवनात आपल्या मनाची स्थिती स्थिर आणि शांत असणे आवश्यक आहे. समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवली, तर ताण न घेता त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्व परिस्थितीत मन सुदृढ राखणे म्हणजे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे होय.
उपाय
विनाकारण कोणत्याही बाबीचा ताण घेऊ नये.
वादविवाद करण्यापेक्षा सुसंवाद राखण्यास महत्त्व द्यावे.
मानसिक व शारीरिक कष्टाची तयारी ठेवावी.
वेळप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.