शिवसेनेचा नवा फॉर्म्युला
By Admin | Updated: January 21, 2017 01:31 IST2017-01-21T01:31:25+5:302017-01-21T01:31:25+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्षातील युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे.

शिवसेनेचा नवा फॉर्म्युला
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्षातील युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे. जागांच्या फॉर्मुल्यावर अर्थात शिवसेना ५५, भाजपा ५८ या फॉर्मुल्यावर चर्चा थांबली आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी निर्णयाचा चेंडू भाजपा नेत्यांच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांची युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेसाठी शिवसेनेने भाजपाला २० जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, हा तो मान्य नसल्याचे भाजपाने जाहीर केले होते. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.
आज आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये चर्चा झाली. या वेळी शिवसेनेच्या वतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे तर भाजपाच्या वतीने खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे आदी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ८८ जागांची मागणी भाजपाने केली होती. तर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला शिवसेनेने दिला होता. मात्र, त्यावर चर्चा झालीच नाही.
मित्रपक्षाचा सन्मान ठेवून जागांचे वाटप व्हायला हवे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. ५५-५८ चा फॉर्म्युला दिला आहे. मात्र, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे युतीची चर्चा आणि उत्सुकता ताणली आहे.(प्रतिनिधी)
>युतीबाबत शिवसेना सकारात्मक आहे. मित्र पक्षांचा विचार करून आम्ही भाजपासमोर प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी त्यावर लवकरात लवकर विचार करावा. शिवसेनेस ५५, भाजपास ५८ आणि मित्र पक्षांना १५ असा प्रस्ताव दिला आहे. याबाबत चर्चा होऊन निर्णय व्हावा.
- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना
>महापालिकेत सत्तेसाठी युती आवश्यक आहे. जागाबाबत बोलणी सुरू आहेत. आम्ही ७५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तसेच मित्र पक्षांचाही विचार करावा, असे म्हटले आहे. शिवसेने आज नवीन प्रस्ताव दिला आहे. त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर पालकमंत्र्यांशी बोलून चर्चा केली जाईल.
- लक्ष्मण जगताप, आमदार, शहराध्यक्ष, भाजपा