शिवसेनेचा ढाण्या वाघ जिल्ह्यातून बेपत्ताच!
By Admin | Updated: October 7, 2014 23:42 IST2014-10-07T22:19:28+5:302014-10-07T23:42:20+5:30
विधानसभा निवडणूक :राजकीय घडामोडींपासूनही दूर

शिवसेनेचा ढाण्या वाघ जिल्ह्यातून बेपत्ताच!
रत्नागिरी : सक्रिय होणार, सक्रिय होणार अशी वदंता झाल्यानंतर पक्षात खरोखरच सक्रिय झालेला शिवसेनेचा ढाण्या वाघ ‘रामदास कदम’ सध्या जिल्ह्याच्या राजकारणातूनच बेपत्ता असल्याचे दिसून येत आहेत. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडत असतानाही रामदास कदम त्यात कोठेही दिसत नसल्याने ते तीव्र नाराज असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर रामदास कदम यांनी आपण जिल्ह्यात सक्रिय होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही कार्यक्रमातही पक्षाच्या व्यासपीठावर रामदास कदम यांचे दर्शन झाले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा बेपत्ता झाले आहेत. कदम यांचे दर्शन ऐन निवडणुकीत त्यांच्या जिल्ह्यातच दुर्लभ झाल्याने विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेना आणि भाजप अलग झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात राज्यस्तरीय नेत्यांना पळावे लागणार आहे. त्यामुळे प्रचारसभेसाठी निवडक पदाधिकाऱ्यांची फळीही शिवसेनेने तयार केल्याचे दिसून येते. असे असताना ऐन निवडणुकीत कदम यांनी शिवसेनेपासून स्वीकारलेले अलिप्तपणाचे धोरण अनेक धुरिणांच्या भुवया उंचावून गेले आहे. कदम यांच्या या अलिप्त राहण्यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. यापूर्वी अनंत गीते यांच्याविरोधात उघडपणे बंड करणाऱ्या कदम यांनी याच वादातून अलिप्तता स्वीकारली असावी, असेही शिवसेना गोटातून बोलले जात आहे. या निवडणुकीत त्यांना उमेदवारी अपेक्षित होती. मात्र शिवसेनेने पक्षातच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याची भावना त्यांच्या समर्थकांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
तिकीट न मिळाल्याने नाराज?
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी आपण शिवसेनेतर्फे दापोलीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय दापोली न मिळाल्यास निदान गुहागरमधून निवडणूक लढवण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात असून त्यातूनच त्यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्विकारल्याचे म्हटले जात आहे. त्यांची नाराजी शिवसेनेला भोवणार का? आणि ही नाराजी कोणाच्या फळाला येणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.