सभापतीपदावर शिवसेनेचाही दावा
By Admin | Updated: March 20, 2015 00:07 IST2015-03-20T00:07:31+5:302015-03-20T00:07:31+5:30
विधान परिषदेच्या सभापतीपदावरून शिवाजीराव देशमुख यांना दूर करण्याकरिता झालेली भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युती फोडण्याकरिता शिवसेनेने या निवडणुकीत उडी घेतली आहे.

सभापतीपदावर शिवसेनेचाही दावा
मुंबई : विधान परिषदेच्या सभापतीपदावरून शिवाजीराव देशमुख यांना दूर करण्याकरिता झालेली भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युती फोडण्याकरिता शिवसेनेने या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेनेने आपल्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेशी जवळीक असलेले अपक्ष सदस्य श्रीकांत देशपांडे यांचे अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली असून, काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याकरिता अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
सभापतीपदाकरिता शुक्रवारी निवडणूक होत असून, त्याकरिता अर्ज दाखल करण्याची गुरुवारी दुपारपर्यंत मुदत होती. या निवडणुकीकरिता काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि शिवसेनेशी जवळीक असलेले अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. रणपिसे व निंबाळकर यांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले आहेत तर गोऱ्हे व देशपांडे यांनी प्रत्येकी एक अर्ज भरला आहे.
विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, शुक्रवारी प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर सभापतीपदाची निवडणूक होईल. ज्या क्रमाने अर्ज दाखल केले गेले त्यानुसार अर्ज मताला टाकले जातील. त्यावर अनुकूल व प्रतिकूल मते देणाऱ्या सदस्यांना उभे राहावे लागेल. ज्या उमेदवाराला सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी मतदान करणाऱ्या सदस्यांचे बहुमत प्राप्त होईल त्याला विजयी घोषित केले जाईल. त्यानंतर पुढील उमेदवारांचे अर्ज मताला टाकले जाणार नाहीत. त्यामुळे सर्वांत प्रथम रणपिसे यांचा, त्यानंतर गोऱ्हे, नंतर निंबाळकर व अखेरीस देशपांडे यांचे अर्ज मताला टाकले जातील. ज्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा असेल त्याला मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सभागृहात उभे राहून अर्ज मागे घेण्याची अनुमती मागावी लागेल.
भाजपाने एकतर स्वत: उमेदवार द्यावा किंवा जर द्यायचा नसेल तर शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भाजपाने आपण या निवडणुकीत तटस्थ राहू, अशी भूमिका घेतली आहे. मात्र भाजपाने तटस्थ राहणे याचा अर्थ राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याकरिता अप्रत्यक्ष मदत करणे हाच असल्याचे शिवसेनेने भाजपाला बजावले आहे. शिवसेनेचा ससेमिरा थोपवण्याकरिता भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये, असा आग्रह धरला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे एका शिवसेना मंत्र्याने सांगितले.
शिवसेना व काँग्रेस ऐनवेळी आपल्या नीलम गोऱ्हे व शरद रणपिसे यांचे अर्ज मागे घेऊन श्रीकांत देशपांडे यांचा अर्ज रिंगणात ठेवतील, अशी शक्यता आहे.
देशपांडे यांना काँग्रेसच्या २१, शिवसेनेच्या ७, लोकभारतीचे १, पीपल्स रिपाइंचे १ आणि अपक्षांची ३ अशी ३३ मते मिळू शकतात. शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराला भाजपाच्या १२ सदस्यांनी पाठिंबा दिला तर देशपांडे यांना ४५ मते मिळतील. परंतु काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे भाजपा तटस्थ राहिली तरी निंबाळकर यांना राष्ट्रवादीची २८, शेकापचे १ व अपक्ष ४ अशी ३३ मते मिळतील. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा व त्यांच्याशी संबंधित ३ अपक्ष मतदान करणार की तटस्थ
राहणार आणि काँग्रेस आपला उमेदवार
मागे घेऊन अपक्ष देशपांडे यांना मते
टाकणार का? यावर बरेच अवलंबून
असेल. उपसभापती वसंत डावखरे यांच्यावर टाय झाल्याने आपले निर्णायक मत टाकण्याची वेळ येणार का? हेही औत्सुक्याचे आहे. ही निवडणूक सत्ताधारी व विरोधक यांचे संबंध बिघडवण्यास अथवा सुधारण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी)
विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २८, काँग्रेसचे २१, भाजपाचे १२, शिवसेनेचे ७, लोकभारतीचा १, शेकापचा १, पीपल्स रिपाइंचा १ व अपक्ष ७ असे एकूण ७८ सदस्य आहेत.
सभापतीपदावरून देशमुख यांना दूर करताना राष्ट्रवादी, भाजपा, शेकाप आणि ४ अपक्ष अशा ४५ सदस्यांनी पाठिंबा दिला होता. भाजपाने पुन्हा राष्ट्रवादीला साथ देऊन रामराजे निंबाळकर हे विनासायास सभापती होऊ नयेत याकरिता शिवसेनेने नीलम गोऱ्हे व श्रीकांत देशपांडे यांचे अर्ज दाखल केले.