अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:28 IST2022-06-21T20:19:03+5:302022-06-21T20:28:47+5:30
मध्यरात्रीनंतर ते याठिकाणी पोहोचल्यानंतर वर्षा बंगल्यावरच त्यांची सोय करण्यात आली. यामुळे दिवसभरात त्यांचे दर्शन बाहेर कोणालाही घडले नाही.

अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास
चेतन धनुरे
उस्मानाबाद - शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे(Shivsena Eknath Shinde) यांच्यासह सूरत गाठलेले आमदार स्वत:हून गेले की नेले, यावरुन मंगळवारी दिवसभर चर्चेची राळ उडाली असतानाच एक खळबळजनक माहिती लोकमतच्या हाती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने प्राप्त झाली. विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर डिनरसाठी जायचे सांगून अनेक आमदारांना वेगवेगळ्या वाहनांनी सूरतला नेल्याची माहिती समोर येत आहे. या वाहनातून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे नाट्यमयरित्या गुजरात बॉर्डरहून निसटले.
सोमवारी विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नव्हती. काही तासाचा प्रवास झाल्यानंतर चलबिचल सुरु झाल्याने पुढे शिंदे साहेब थांबले आहेत, त्यांना भेटू, असे सांगून वाहने तशीच पुढे नेण्यात आली. ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती.
याचवेळी आमदार कैलास पाटील यांच्या मनात पाल चुकचुकल्याने ते लघुशंकेचा बहाणा करत वाहनाबाहेर आले. यानंतर अंधारात कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. अंधाराचा रस्ता, रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरी झेलत कैलास पाटील यांनी पायी प्रवास सुरुच ठेवला. जवळपास ४ किलोमीटर अंतर पावसात भिजत अंधारातून कापले. यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीवरुन लिफ्ट घेतली. पुढे तो दुचाकीस्वार गाव आल्याने थांबल्यामुळे पुन्हा पायी प्रवास सुरु केला. काही वेळातच एका ट्रकला लिफ्ट मागून त्यांनी दहिसरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. तेथून पुढे आपल्या वाहनाने थेट वर्षा बंगला गाठला.
मध्यरात्रीनंतर ते याठिकाणी पोहोचल्यानंतर वर्षा बंगल्यावरच त्यांची सोय करण्यात आली. यामुळे दिवसभरात त्यांचे दर्शन बाहेर कोणालाही घडले नाही. बैठकीला जाणाऱ्या आमदारांतही ते दिसले नाहीत. बैठकीनंतर बाहेर पडतानाही कैलास पाटील दिसले नाहीत. त्यांना सुरक्षितरित्या बंगल्यावर ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना दमदाटी अथवा दबाव टाकून नेलंय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.