सर्व समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व
By Admin | Updated: April 1, 2015 02:24 IST2015-04-01T02:24:05+5:302015-04-01T02:24:05+5:30
राजकीय वादात आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसह इतर महत्त्वाच्या पाच विशेष समिती सदस्यांची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली.

सर्व समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व
ठाणे : राजकीय वादात आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसह इतर महत्त्वाच्या पाच विशेष समिती सदस्यांची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. तसेच स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवडही या वेळी करण्यात आली. या सर्व समित्यांवर शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. तर काँग्रेसने सर्वच समित्यांमध्ये महिलांना प्राधान्य दिले.
महापालिकेत मागच्या दाराने प्रवेश करणाऱ्यांच्या नावांची घोषणा सोमवारीच झाली होती. त्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली होती. त्यानुसार मंगळवारी शिवसेनेतून राम आणि विकास रेपाळे, राष्ट्रवादीतून मनोज प्रधान, काँग्रेसमधून प्रदीप राव आणि रिपाइं एकतावादीतून नागसेन इंदिसे यांची निवड झाली.
तर स्थायी समितीतून मंगळवारी स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, संजय मोरे, संजय भोईर, अशोक वैती, गिरीश राजे आणि नारायण पवार, नजीब मुल्ला हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी आता शिवसेनेतून मधुकर पावशे, एकता भोईर, अनिता बिर्जे, बालाजी काकडे यांची तर काँग्रेसमधून मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीतून नजीब मुल्ला यांची पुन्हा वर्णी लागली. त्यांच्या जोडीला योगेश जाणकर यांची तर मनसेतून राजश्री नाईक यांची निवड झाली आहे.
काँग्रेसने स्वीकृत आणि स्थायी समिती वगळता इतर पाच विशेष समित्यांवर रेश्मा पाटील, असिया कुरेशी, मेघना हंडोरे, साजिया अन्सारी आणि साजिया कुरेशी या पाच महिलांची निवड केली आहे. शिवसेनेत अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. त्यामुळे अनेक निष्ठावंतांत नाराजीची भावना आहे. (प्रतिनिधी)