Chandrakant Khaire : "शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू"; दसरा मेळाव्यावरून चंद्रकांत खैरे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:31 IST2022-09-19T17:19:41+5:302022-09-19T17:31:11+5:30
Shivsena Chandrakant Khaire : "परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात."

Chandrakant Khaire : "शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू"; दसरा मेळाव्यावरून चंद्रकांत खैरे आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखल्याचेही बोलले जात आहे. मात्र, यातच आता आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून, त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलं आहे.
"शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू" असं म्हणत चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आक्रमक झाले आहेत. परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार खैरेंनी व्यक्त केला आहे. तसेच दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो. ही परंपरा खंडित होणार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडली तर ईडी सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"शिवसैनिकांनो.. कामाला लागा, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार"
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेश
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवरही सडकून टीका केली. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. दसरा मेळाव्यासाठी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखसोबत असल्याने आत्मविश्वास दुणावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.तसेच शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले.