टेबल टेनिस स्पर्धेत शिवम दासचा धक्कादायक विजय

By Admin | Updated: September 20, 2016 04:08 IST2016-09-20T04:08:48+5:302016-09-20T04:08:48+5:30

शिवम दासने अव्वल मानांकित रेगन अल्बुक्वेर्क्यूचा ४-० असा धुव्वा उडवत मुंबई उपनगर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत ज्युनियर मुलांच्या अंतिम फेरीत धडक मारली

Shivam Das's shocking victory over table tennis championship | टेबल टेनिस स्पर्धेत शिवम दासचा धक्कादायक विजय

टेबल टेनिस स्पर्धेत शिवम दासचा धक्कादायक विजय


मुंबई : पाचव्या मानांकित शिवम दासने अव्वल मानांकित रेगन अल्बुक्वेर्क्यूचा ४-० असा धुव्वा उडवत मुंबई उपनगर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत ज्युनियर मुलांच्या अंतिम फेरीत धडक मारली. तर मुलींमध्ये आदिती सिन्हाने सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि युवा गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करून तिहेरी विजेतेपदाची संधी निर्माण केली आहे.
जुहू पार्ले जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शिवमने संभाव्य विजेत्या रेगनचा सलग चार गेममध्ये पाडाव केला. पहिला गेम सहजपणे जिंकल्यानंतर शिवमने बलाढ्य रेगनची झुंज ११-७, १५-१३, १३-११, १३-११ अशी संपुष्टात आणली. मुलींमध्ये आदितीने एकहाती दबदबा राखताना सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि युवा गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. सब ज्युनिअर गटात आदितीने संपदा भिवंडकरचा ११-४, ११-९, ११-६, ८-११, ११-३ असा पाडाव केला. तर, युवा गटात आदितीने पहिला गेम गमावल्यानंतर झुंजार खेळ करत विधी शाहला ९-११, ११-८, ११-१, ११-४, ११-६ असे पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच, तन्विता ठाकूरचे आव्हान ११-४, ११-६, ९-११, ११-४, १२-१० असे संपुष्टात आणून आदितीने दिमाखात ज्युनिअर गटाची अंतिम फेरी गाठली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Shivam Das's shocking victory over table tennis championship