शिवाजी विद्यापीठाचा प्रबंध जगात सर्वोत्कृष्ट
By Admin | Updated: November 25, 2014 00:38 IST2014-11-25T00:35:27+5:302014-11-25T00:38:47+5:30
‘इशा’कडून गौरव : वाळव्याच्या सावंता माळी यांचा शोधप्रबंध

शिवाजी विद्यापीठाचा प्रबंध जगात सर्वोत्कृष्ट
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या पीएच.डी. शोधप्रबंधास आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध म्हणून गौरविण्यात आले आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथील चेन्नॉम नॅशनल विद्यापीठाच्या स्कूल आॅफ अॅडव्हान्स्ड केमिकल इंजिनिअरिंगचे संशोधक डॉ. सावंता सुभाष माळी यांच्या शोधप्रबंधास फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय रसायनविद्युत व जलविद्युत संस्थेतर्फे (इशा) सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. माळी यांनी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात सौरघट निर्मितीविषयक संशोधन केले आहे. त्यांनी डॉ. प्रमोद एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सॉल्व्होथर्मल सिंथेसिस आॅफ टीआयओटू नॅनोपार्टिकल्स फॉर सोलार सेलप्लिकेशन्स’ या विषयावर विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता.
‘इशा’ ही विद्युत संशोधन क्षेत्रातील संस्था आहे. ही संस्था दरवर्षी विद्युतघट संशोधन क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय योगदानासाठी जगातील तीन संशोधकांना पुरस्कार देऊन गौरविते. यामध्ये जीवनगौरव, वरिष्ठ वैज्ञानिक, सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध या पुरस्कारांचा समावेश असतो. संस्था दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद भरविते. यात हे पुरस्कार दिले जातात.
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट शोधप्रबंधाचा पुरस्कार डॉ. माळी यांच्या शोधप्रबंधास जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध पुरस्कार मिळविणारे डॉ. माळी हे केवळ सन २०१० पासूनचे तिसरे पुरस्कारार्थी आहेत. यापूर्वी हा पुरस्कार जपानच्या डॉ. तकाकी तानगुशी (२०१०), अमेरिकेच्या डॉ. ख्रिस्तिना मोझॅड (२०१३) यांना मिळाला आहे.
डॉ. माळी यांना संशोधनासाठी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. प्रमोद एस. पाटील, चेन्नॉम नॅशनल विद्यापीठातील डॉ. सी. के. हाँग, प्रा. डॉ. जे. एच. किम, भाभा
अणुऊर्जा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी. ए. बेट्टी यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
‘मटेरियल टुडे’कडूनही गौरव
डॉ. माळी यांचे मूळ गाव बागणी काकाचीवाडी (ता. वाळवा, जि. सांगली). प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण करत हे यश मिळविले आहे. त्यांचे विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संशोधन नियतकालिकांत ५३ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी विविध संशोधन परिषदांत ४५ शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या संशोधनास पदार्थविज्ञान शास्त्रातील ‘मटेरियल टुडे’ या शोधपत्रिकेने मुखपृष्ठावर स्थान देऊन त्यांचा गौरव केला आहे.