शिव मंदिरात कोरली कलाविष्कारांची झालर
By Admin | Updated: May 7, 2017 05:48 IST2017-05-07T05:48:44+5:302017-05-07T05:48:44+5:30
प्राचीनतेची साक्ष देणारे अंबरनाथचे शिव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची कमतरता नाही. परंतु, मंदिर

शिव मंदिरात कोरली कलाविष्कारांची झालर
- पंकज पाटील -
प्राचीनतेची साक्ष देणारे अंबरनाथचे शिव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची कमतरता नाही. परंतु, मंदिर आणि परिसराचा पर्यटनस्थळाच्या दृष्टीनेही विकास व्हावा, हे लक्षात घेत त्याचे महत्त्व पटवण्याच्या दृष्टीने सुरू झाला शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल. या फेस्टिव्हलमुळे शिव मंदिरात कलाविष्कारांची झालर कोरली गेली आहे.
बरनाथमधील प्राचीन शिव मंदिरात कलाकृतीचा अनुभव घेण्यासोबत महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, या मंदिराच्या परिसराची आणि मंदिराची झालेली दुरवस्था सुधारण्यासाठी पुरेशा निधीची गरज आहे. या मंदिर आणि परिसराचे महत्त्व पटवण्याच्या उद्देशाने २०१५ सालापासून शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. गतवर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे हा फेस्टिव्हल रद्द करण्यात आला होता. यंदा या महोत्सवाच्या निमित्ताने अंबरनाथकरांना पुन्हा एकदा भव्यदिव्य कलाविष्कारांचा अनुभव घेण्यासाठी संधी मिळाली आहे.
अंबरनाथच्या शिव मंदिराची महती सर्वज्ञात आहे. मात्र, या मंदिराचा प्रचार आणि प्रसार योग्यरीतीने व्हावा आणि त्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करण्याच्या उद्देशाने अंबरनाथमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. ज्या मंदिरात भाविक दर्शनासाठी येत होेत,े त्याच मंदिरात भाविकांना दर्शनासोबत कलेचा आनंद घेता यावा, यासाठी या आर्ट फेस्टिव्हलमध्ये जगविख्यात कलाकारांची कलाकृती जवळून अनुभवण्याची संधी अंबरनाथकरांसोबत संपूर्ण ठाणे जिल्हावासीयांना मिळत आहे. शिव मंदिराला साजेसा फेस्टिव्हल करणे म्हणजे आयोजकांची कसरतच आहे. त्यामुळेच सर्व स्तरांतील आणि सर्व वयोगटांतील नागरिकांना या ठिकाणी मनोरंजनाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सुटीचे दिवस असल्याने लहान मुलांच्या मनोरंजनासाठी या फेस्टिव्हलमध्ये विशेष गेम्स ठेवण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रकारचे अॅडव्हेंचर्स गेम्सही या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी फिश पॉण्ड तयार करण्यात आले आहे.
राष्ट्रीयस्तरावरील चित्रकारांच्या लाइव्ह पेंटिंगचा अनुभवदेखील या ठिकाणी प्रेक्षकांना घेता येणार आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांचा अक्षरांसोबतचा खेळ अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली आहे. इतकेच नव्हे तर ते शिकण्याची संधीदेखील मिळाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील आर्ट गॅलरीत थ्रीडी पेंटिंग पाहण्याचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. समुद्रकिनारी साकारण्यात येणारे सॅण्ड आर्ट अंबरनाथच्या शिव मंदिरच्या प्रांगणात साकारण्यात आले आहे. महादेवाची ही कलाकृती पाहण्यासठी आणि त्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
विविध कलाकृतींचे आणि तयार केलेल्या आर्टचे भव्य प्रदर्शन येथे भरवण्यात आले असून १० हजार चौरस फुटांची ही आर्ट गॅलरी सर्वांचे लक्ष वेधणारी आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले पेंटिंग हे आंतरराष्ट्रीय कलाकारांनी साकारले आहे. यासोबतच या ठिकाणी खाद्यपदार्थ महोत्सवही भरवण्यात आला असून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद येथे येणाऱ्या रसिकांना घेता येत आहे.
या महोत्सवाकडे तरुणाईही आकर्षित व्हावी, या हेतूने रॉक बॅण्ड आयोजिण्यात आला असून त्यासाठी स्वतंत्र कला मंच उभारण्यात आला आहे. प्रत्येक ग्रुपला या ठिकाणी एक तास आपल्या बॅण्डचे प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्य कला मंचावर दिग्गज कलाकारांची कलाकृती अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि बेला शेंडे यांच्या सुरांचा आनंद रसिकांना घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात राहुल देशपांडे यांच्यासोबतीने अंबरनाथकरांनी सूरमयी संध्याकाळ अनुभवली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक ओजस आधिया यांनी आपल्या बहारदार कलेने अंबरनाथकरांची मने जिंकली. त्यांच्या तबल्याच्या तालावर प्रेक्षकांच्या टाळ्यांनीदेखील तेवढीच चांगली साथ दिली. या महोत्सवाच्या निमित्ताने जे.जे. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वॉलपेंटिंग्ज ठिकठिकाणी लावण्यात आल्याने अवघ्या शिव मंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. हा फेस्टिव्हल अंबरनाथला कलेच्या विशिष्ट उंचीवर नेणारा ठरला आहे.