शिवशाहीच्या तिकीट दरांत मोठी कपात; खाजगी वाहतुकदारांशी करणार स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:21 IST2019-02-08T20:21:17+5:302019-02-08T20:21:35+5:30
एसटी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता.

शिवशाहीच्या तिकीट दरांत मोठी कपात; खाजगी वाहतुकदारांशी करणार स्पर्धा
मुंबई : शिवशाहीच्या तिकीट दरांमध्ये मोठी कपात करण्यात आली असून कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहेत. भाडेदरात २३० ते ५०५ रूपयांची कपात करण्यात आली आहे.
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दरकपात करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.
एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे.