मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेना उपस्थित राहणार
By Admin | Updated: May 25, 2014 19:59 IST2014-05-25T19:58:14+5:302014-05-25T19:59:20+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यात निमंत्रित केल्याने एनडीएत निर्माण झालेले रुसवेफुगवे अखेरीस संपले आहेत.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेना उपस्थित राहणार
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २५ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यात निमंत्रित केल्याने एनडीएत निर्माण झालेले रुसवेफुगवे अखेरीस संपले आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे स्वतः व पक्षाचे सर्व खासदार उद्या दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याती उपस्थितीविषयी निर्णय घेण्यासाठी रविवारी संध्याकाळी मुंबईत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणारे शिवसेनेचे खासदारही उद्याच शपथ घेतील यावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रीपद येणार असून या मंत्रीपदावर शिवसेनेच्यावतीने अनंत गीते यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान सोमवार २६ मेरोजी होणा-या शपथविधीसाठी मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रीत केले असून या निमंत्रणाला मान देत शरीफही सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.. मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रीत केल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली होती. शिवसेना या सोहळ्यालाच दांडी मारण्याची चर्चाही सुरु होती.