CM Devendra Fadnavis: मागील दशकभरात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती तुटली आणि नवी समीकरणे राज्याच्या राजकारणात उदयास आली. युती कशामुळे तुटली याबाबत दोन्ही बाजूचे नेते अनेकदा दावे-प्रतिदावे करत असतात. अशातच भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गौप्यस्फोट करत केवळ चार जागांच्या वादामुळे युती तुटल्याचा दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "२०१४ साली आमचा तेव्हाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू होती. आम्ही त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा देण्यासही तयार झालो होतो. पण त्यांनी मनात एक आकडा ठरवला होता. आम्ही त्यांना १४७ जागा द्यायला तयार झालो होतो, आम्ही १२७ जागा लढवणार होतो आणि इतर जागा अन्य मित्रपक्षांना द्यायच्या होत्या. पण ते १५१ जागांवर अडून राहिले. त्यानंतर आम्ही ठरवलं की, १४७-१२७ हा फॉर्म्युला मान्य असेल तरंच शिवसेनेसोबत युती करायची. हा फॉर्म्युला मान्य असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, अन्यथा युती होऊ शकणार नाही, असा अल्टीमेटम आम्ही शिवसेनेला दिला होता. तुमचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल, असंही सांगितलं होतं. पण विधात्याच्या मनात मला मुख्यमंत्री करण्याचं असेल. शिवसेनेनं सांगितलं की आमच्या युवराजांनी १५१ जागांची घोषणा केलीय. शिवसेना तेव्हा कौरवांच्या मूडमध्ये होती की आम्ही पाच गावेही देणार नाहीत. ते कौरवांच्या भूमिकेत गेल्यानंतर आम्हीही सांगितलं की आमच्याकडेही श्रीकृष्ण आहेत, आम्हीही लढाई लढू," असा दावा फडणवीस यांनी केला आहे. बिर्ला मातोश्री सभागृह येथे राजस्थान ग्लोबल फोरमच्या वतीने सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल
दरम्यान, युती तोडण्याचा निर्णय घेण्यात येत होता तेव्हा निवडणुकीत यश मिळेल की नाही, याबाबत आमच्या पक्षात फक्त अमित शाह, ओमप्रकाश माथुर आणि मी अशा तिघांनाच आत्मविश्वास होता, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांच्या दाव्यावर राऊत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत केलेल्या दाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "भाजपची शिवसेनेसोबतची युती तुटू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. पण युती तोडावी, असे दिल्लीतून आदेश आले होते," असा दावा राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना केला आहे.