Maharashtra Politics: धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेला तर काय? उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरु? प्लॅन B काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 10:22 IST2023-01-14T10:21:34+5:302023-01-14T10:22:44+5:30
Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास काय पर्याय असू शकतात, याबाबत ठाकरे गटाने तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेला तर काय? उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरु? प्लॅन B काय आहे?
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीनंतर वेगळा गट स्थापन केला. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे गट-भाजपचे सरकार सत्तेत आले. यानंतर महाराष्ट्राचा हा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. सर्वोच्च न्यायालयात तारखांचा सिलसिला सुरू असून, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सविस्तर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तिवाद केला. यानंतर आता धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेला, तर ठाकरे गटाकडे काय पर्याय असू शकतात, याबाबत चर्चा सुरू झाली असून, ठाकरे गटाकडून प्लान बी ची तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आगामी काही दिवसांत शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण कुणाकडे जाणार, यावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होईल. १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर यासंबंधी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान उभे ठाकेल, असे म्हटले जात आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाने प्लॅन बीची तयारी सुरु केल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाकडे नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला तर दोन प्रकारे तयारी सुरु करण्यात आली आहे. एक म्हणजे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल. तसेच पक्षासाठी निवडणूक चिन्ह आणि नाव ठरवण्याचा फैसला ठाकरे गट जनतेवर सोपवेल. जनतेच्या मतानुसार, पक्षाचे नवे चिन्ह आणि नाव निश्चित केले जाईल. तज्ज्ञांच्या मते, निवडणूक आयोगाने सादिक अली केसचा आधार घेतला तर एकनाथ शिंदे गटाकडून निर्णय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निकालानंतर काय करायचे, याचे नियोजन सुरु केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुरू आहे. शिवसेनेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तसेच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार यासंबंधीच्या महत्त्वाच्या याचिकांवर ही सुनावणी सुरु आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी यासंबंधीची सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी निवडणूक आयोगासमोर शिवसेना कुणाची हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"