“एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे”; कुणी दिली खुली ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 21:36 IST2025-02-01T21:33:55+5:302025-02-01T21:36:31+5:30
Shiv Sena Thackeray Group And Shinde Group News: एकनाथ शिंदे यांना भाजपाने वेगळे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा दावा करण्यात आला आहे.

“एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे”; कुणी दिली खुली ऑफर?
Shiv Sena Thackeray Group And Shinde Group News: दोन्ही शिवसेना एकत्र यायला हवी, असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटते. आजही आम्ही सुखदु:खाची विचारपूस करतो. अशावेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाट यांनी व्यक्त केले होते. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
वरिष्ठ फळीतील नेत्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकते. कारण माझ्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटते की आम्ही एकत्र आले पाहिजे. दोन्ही पक्षात अंतर वाढत आहे. ते वेळीच थांबविले नाही तर भविष्यात दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जातील. यामुळे आता जोडायची वेळ आहे . कारण आता दोन्ही पक्षांत एवढे अंतर नाही की ते एकत्र येऊ शकणार नाही. दोन शिवसेना होणे शिवसैनिकांना आवडले नाही. माझ्या मनाला यातना होतात. ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी भेटले की, त्यांच्या आणि आमच्या मनाची अवस्था अशीच असते. तू त्या पक्षात, मी ह्या पक्षात हे दोघांनाही पटत नाही. पण करावे काय? सत्तेमध्ये जाण्याचा धडपडीचा हा परिणाम झाला. संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले होते. यावरून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीला चंद्रकांत खैरे यांना दिलेल्या ऑफरबाबत दावे करण्यात आले होते. आता चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना ऑफर दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे
पक्षातून फुटण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले असते तर त्यांनी ऐकले असते. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते. पण परिस्थिती वेगळी झाल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. मात्र भविष्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. शिरसाट यांनी त्यांचे बॉस एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदा बोलावं आणि त्यांनी ठरवल्यावर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे यावे. ते ठरवतील काय करायचे. एकनाथ शिंदे यांना भाजपाने वेगळे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या भीतीपोटीच संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी गुगली टाकली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे संजय शिरसाट म्हणत असतील तर त्यांनी हा विचार आधीच का केला नाही, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.
दरम्यान, मला भाजपाकडून राज्यपालपदाची तर शिवसेनेकडून खासदारकीची ऑफर होती, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. केंद्रीय बजेट हे संमिश्र आहे. नोकरवर्ग आणि व्यापाऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. बजेटला खराबही म्हणता येणार नाही आणि चांगलेही म्हणता येणार नाही, असे खैरे म्हणाले.