Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News:उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेले फार आवडले असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो हे समजावे. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दिल्लीत साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राजकीय प्रश्नांवर भाष्य करताना केलेल्या विधानावरून ठाकरे गटातील नेते नीलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावरून टीका केली आहे. चार टर्म ज्यांना फक्त फॉर्म भरावा लागला आणि पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यांनी असा आरोप करणे दुर्दैवी आहे. असा आरोप करणे ही नमक हरामी आहे, असा पलटवार दानवे यांनी केला.
मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, उदाहरण देतो की, मी ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. छत्रपती संभाजीनगरसारख्या मराठवाड्यातील काम करणारा राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. मला पक्षाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामांसाठी निधी दिला आहे. परंतु, माझ्याकडून कधी पक्षाने एक रुपया कधी मागितला नाही किंवा कधी मला द्यावा लागला नाही, आता नीलम ताई बोलत आहेत. त्या ज्येष्ठ आहेत. त्यांनी अशा प्रकारे आरोप करणे दुर्दैवी आहे. मातोश्रीवरून मुख्यमंत्रीपदापासून अनेक पदापर्यंत अनेक पदे पक्षाने दिली, तर मग मातोश्रीवर मर्सिडीजची रांग लागली असती, कार उभ्या करायला जागा राहिली नसती, असे दानवे म्हणाले.
दरम्यान, साहित्य संमेलनामध्ये अशा विषयांचा संबंध काय आहे? राजकारण करायला साहित्य संमेलनामध्ये जाता का? साहित्य संमेलन राजकीय कारणासाठी वापरले जातात का? आरोप करणे आता फॅशन झालेली आहे. महाराष्ट्राचा अपमान नीलमताई करत आहेत. ठाण्याच्या बळावर शिवसैनिक कमवत होते असे आहे का? नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं आहे, मी काहीतरी करते आहे, दुसऱ्यांना नाव ठेवायची आणि स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवायची. याउलट नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी काय दिले, हेच त्यांनी जाहीर करावे. चला होऊन जाऊ दे, असे आव्हान दानवे यांनी दिले.