आधी 'मातोश्री'वर पाठवले पेढे, आता शिवसेनेबद्दल कृतज्ञता; भुजबळांच्या भूमिकेनं राष्ट्रवादीला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 01:04 PM2018-05-10T13:04:04+5:302018-05-10T13:08:59+5:30

ज्यावेळी मला जामीन मंजूर झाला त्यावेळी पहिला फोन शरद पवार यांनी केल्याचे गुपित त्यांनी या पत्रकार परिषदेत उघड केले.  

shiv sena Supports me says chhagan bhujbal | आधी 'मातोश्री'वर पाठवले पेढे, आता शिवसेनेबद्दल कृतज्ञता; भुजबळांच्या भूमिकेनं राष्ट्रवादीला चिंता

आधी 'मातोश्री'वर पाठवले पेढे, आता शिवसेनेबद्दल कृतज्ञता; भुजबळांच्या भूमिकेनं राष्ट्रवादीला चिंता

Next

मुंबई -  शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतातच, असं म्हणत छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसंच, माझ्या पडत्या काळात शिवसेना दोन शब्द चांगले  बोलली,याचं समाधान आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे काँग्रेस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. गुरूवारी (ता. 10 मे) सकाळी केईएम हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर छगन भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतान त्यांनी हे वक्तव्य केलं आेहे. जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांचा सर्वात पहिला फोन आल्याचं ते म्हणाले. आराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्याचं भुजबळांनी नमूद केलं.

तुरुंगातील अनुभव कसा होता असे विचारल्यानंतर भुजबळ मिश्किलपणे हसत म्हणाले की, 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' असे उत्तर दिले.  महाराष्ट्र सदनबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले की, ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपात मला तुरुंगवास झाला, आज त्याच महाराष्ट्र सदनाचा सर्वजण लाभ घेत आहेत, देशात या सदनाचा लौकिक आहे. 

‘सामना’त शिवसेनेने भुजबळांबद्दल काय म्हटले होते?   

''भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा'',अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भुजबळांवर दोनच दिवसांपूर्वी टीका केली होती. 

भुजबळ पुन्हा उतरणार मैदानात; पुढच्या महिन्यात पुण्यातून 'हल्लाबोल'

छगन भुजबळ 10 जूनला पुण्यात भाषण करणार आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतरचं त्यांचं हे पहिलंच भाषण असेल. सध्या राज्यभरात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरू आहे. या यात्रेचा समारोप 10 जूनला पुण्यात होईल. छगन भुजबळांच्या भाषणानं या यात्रेचा समारोप करण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेसनं आखली आहे. 

दोन वर्ष तुरुंगात होते छगन भुजबळ

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगवासात होते. 4 मे रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे दहा तास कसून चौकशी केल्यानंतर १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक केली होती आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सुमारे १०० कोटी रुपये खर्चून दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) भुजबळ यांच्यासह पंकज, समीर आणि अन्य १४ जणांवर आधीच आरोपपत्र दाखल केले होतं. या प्रकरणाची चौकशी पुढे नेत, भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं ‘ईडी’नं म्हटलं होतं आणि छगन भुजबळ यांना अटक केली होती.  

Web Title: shiv sena Supports me says chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.