मुंबई - काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे तर पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा विचार भाजपा आणि रा. स्व. संघाचा आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जिन्नाच्या मुस्लीम लीगशी युती होती, त्या मुस्लीम लीगच्या सरकारमध्ये भाजपा नेते श्याम प्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे शिंदेसेनेला मोर्चाच काढायचा तर तो फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपाने आज काँग्रेस विरोधात मोर्चे काढले, त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपाने हा मोर्चा त्यांच्याच सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्याच्या घरावर काढायला हवा होता. या मंत्र्याचे भाऊ ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक आहेत, या पुस्तकात सर्व गोष्टींचा उहापोह आहेच पण आरएसएसचा थेट संबंध कसा आहे हेही लिहिलेले आहे, त्यामुळे त्यांच्या मोर्चाचे लक्ष्य चुकीचे होते आणि हा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आलाच असता तर त्यांना सामोरे जाऊन हे पुस्तकही त्यांना भेट दिले असते असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट व मालेगाव बॉम्बस्फोट या दोन प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. रेल्वे बॉम्ब स्फोटातील निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने लगेच जाहीर केला पण मालेगाव प्रश्नी अद्याप सरकारने भूमिका घेतलेली नाही. मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याविरुद्ध फडणवीस सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का, हे त्यांनी स्पष्ट करावे. तसेच मालेगाव बॉम्बस्फोट कोणी केला याचे उत्तर मिळाले पाहिजे.
आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल महाराष्ट्राला नितांत आदर आहे, त्यांच्याबद्दल कळवळा आहे, ते शहीद झाले. दरवर्षी २६/११ ला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालता आणि आता त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करता हा भाजपा, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या बगलबच्यांचा दुटप्पी पणा आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाच्या लोकांनी शहीद हेमंत करकरे व तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सर्व मुलाखती पहाव्यात म्हणजे स्पष्ट होईल. या प्रकरणात चार्जशीट कसे बदलले, या खटल्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना प्रकरण सौम्य करण्यास कोणी सांगितले होते, या घटनाक्रमाची निट सांगड घालून पहावे असेही सपकाळ म्हणाले.