“देवेंद्र फडणवीस चांगले काम करतायत, त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे”; संजय शिरसाटांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 18:12 IST2023-10-07T18:08:30+5:302023-10-07T18:12:38+5:30
Sanjay Shirsat News: एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

“देवेंद्र फडणवीस चांगले काम करतायत, त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे”; संजय शिरसाटांचा सल्ला
Sanjay Shirsat News: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध गौप्यस्फोट सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदाबाबतही दावे केले जात आहेत. अजित पवार आता पुढील मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नेत्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केले होते. देवेंद्र फडणवीस इतके चांगले काम करत आहेत की, त्यांनी आता केंद्रात नेतृत्व करावे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना संजय शिरसाट यांनी सल्ला दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावे
मुख्यमंत्रीपदाबाबतची काही लोक बॅनर लावतात. यावर अजितदादांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले. मीही सांगतो की, ते बॅनर लावतात त्यात काही गैर नाही. जे बॅनर लावतात त्यांना शुभेच्छा आहे. पण माझीही इच्छा आहे की, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत. देवेंद्र फडणवीस इतके चांगले काम करत आहेत. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भरपूर क्षमता आहे. म्हणून आम्हालाही वाटते त्यांनी तेही नेतृत्व केले पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी घणाघाती नाही तर घाण टीका केली. तुमच्यावर कारवाई होणार म्हणून टीका करत आहात. मुख्यमंत्र्यांवर इतक्या खालच्या पातळीवर टीका करणारे आम्ही पाहिलेच नाही. संजय राऊत ही राज्याला लागलेली कीड आहे. जर आमच्या साहेबांना अशा भाषेत बोलत असतील तर त्यांचाही ऊद्धार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सडेतोड उत्तर मिळेल, असा जोरदार पलटवार संजय शिरसाट यांनी केला.