Shiv Sena Shinde Group Leader Ramdas Kadam News: गेली २५ वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. या काळात मुंबईतील ६० टक्के मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. याला जबाबदार उद्धव ठाकरे नाहीत का, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, या घोषवाक्याने पक्षकार्याला सुरुवात केली आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकले, हे वास्तव आहे. या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना रामदास कदम पुढे म्हणाले की, मराठी माणसाचे नाव घेण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत पत्रकार परिषद घेतली. आता मला सांगा की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी केली. यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना काळिमा फासला, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकात पाय ठेवण्याचा तरी अधिकार आहे का, अशी विचारणा रामदास कदम यांनी केली.
उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात?
उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले, तर बाळासाहेबांना अतिशय दुःख होईल. त्यांच्या मनाला वेदना होतील. माझे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो, असा विचार ते करतील. ही बाब होणे आवश्यक आणि गरजेची आहे, अशी मोठी मागणी रामदास कदम यांनी केली.
दरम्यान, आदित्य ठाकरे देवाभाऊ.. देवाभाऊ.. करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. उद्धव ठाकरे मोठा फुलांचा गुच्छ घेऊन भेटत आहेत. कालपर्यंत तुम्ही एकतर तू राहशील किंवा मी राहीन, देवाभाऊ सगळे खाऊ, अशी भाषा करत होतात. आता अचानक असे काय झाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या पायावर डोके ठेवायची वेळ उद्धव ठाकरेंवर आली. शिवसेनाप्रमुखांचे तुम्ही पुत्र आहात, याचे भान ठेवा. स्वाभिमान ठेवा. किती लाचारी पत्करणार आहात. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची पापाची पावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखली पाहिजेत, असे माझे प्रामाणिक मत आहे, या शब्दांत रामदास कदम यांनी निशाणा साधला.