“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:14 IST2025-07-04T16:09:40+5:302025-07-04T16:14:54+5:30
Raj Thackeray And Uddhav Thackeray Event in Mumbai: जिकडे-तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यातून विधानभवनही सुटले नसल्याचे म्हटले जात आहे.

“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
Raj Thackeray And Uddhav Thackeray Event in Mumbai: वरळीच्या डोममध्ये ठाकरे बंधुंचा मराठी विजयी मेळावा होणार आहे. दोन्ही बंधुंनी या मेळाव्याकडे राजकीय लेबल न लावता मराठी भाषेचा विजय म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी तब्बल १८ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर भाषण करताना पाहायला मिळणार असल्याने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, विधानभवनातही राज-उद्धव या ठाकरे बंधूंची चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार अनिल परब आणि मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी ५ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. दोन्ही पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांकडे या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बैठकही पार पडली आहे. कार्यक्रमाची रुपरेषा कशी असावी? कुणाची भाषणे व्हावी? मंचावर कोण असतील? हे सगळे निश्चित करण्यात असून, दोन्ही बाजूंकडून १५ मुद्द्यांवर एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. यातच विधानभवनातही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच विषयी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभवनातही राज-उद्धवच
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे 'उद्धवसेना' व 'शिवसेना' असे दोन पक्ष होऊनही पूर्वाश्रमीची मैत्री काही जणांना विसरता आलेली नाही. पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेत असणारे, परंतु आता विभागलेले चार आजी-माजी आमदार व एक माजी मंत्री गप्पा मारत विधान भवनात उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या दालनाबाहेर उभे होते. उद्धव सेनेतून कुणी बाहेर पडतो, आमच्याकडे येतो हे नवीन नाही. पण, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने नुकसान होणार या माजी मंत्र्यांच्या विधानाने उद्धव-राज यांची चर्चा सुरू झाली. एवढ्यात शिंदे सेनेचे विद्यमान मंत्री तेथून जात होते. उद्धव सेनेच्या आमदारांना पाहून त्यांनीही 'आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार' अशी कोपरखळी मारली. त्या आमदारांच्या चर्चेकडे ज्यांचे लक्ष नव्हते त्यांचेही लक्ष मंत्र्यांच्या विधानाने वेधले, अशी कुजबूज सुरू आहे.
दरम्यान, ठाकरे हे केवळ आडनाव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेले आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा याचा उल्लेख होईल. मोठ्या विश्वासाने आणि शून्यातून त्यांनी शिवसेना उभी केलेली आहे. ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही. कुठलीही ताकद संपवू शकणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर त्यांचे मनापासून स्वागत करते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.