Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एकामागून एक ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्यभरातून ठाकरे गटाला गळती लागली असून, ही गळती थांबता थांबत नाही. रत्नागिरीतील नेते राजन साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यातच आता आणखी काही नेते शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत, असे सांगितले जात आहे. यातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या एका विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील नेत्यांनी थेट ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटे बोललेले मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावते. पण माझे दुर्दैव मला सतत आडवे आले आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, या पोराला महाराष्ट्रात फिरवा याला महाराष्ट्रात फिरवला तर ग्रामीण भागातील, तळागाळातील माणूस आपल्याला जोडला जाईल. शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद लाभले. त्यानंतर पवारांचे आशीर्वाद लाभले, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. यावर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.
ठाकरे गटाचे दुर्दैव, भास्कर जाधवांचे आम्ही स्वागतच करू
ठाकरे गटातील अनेक जण आमच्यासोबत येणार आहेत. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ आहेत अशा व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल, तर आम्ही स्वागत करू. त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव भास्कर जाधव यांचे नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही. कोकणात नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज असल्याचे सांगत उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल चांगले बोलत आहेत. त्यांनी कायम चांगले बोलावे, असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला होता.