नाशिक : काँग्रेस-राष्ट्रवादीने जातीयवाद आणि आरक्षणाचा उपयोग करून नेहमीच मतांचे राजकारण केले. भाजपा-सेनेला बदनाम केले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील चपाती प्रकरणालाही विरोधकांकडून जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचा रंग दिला जात असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेना खासदारांची पाठराखण केली.
देशातील गरिबी, भूकबळी, बेरोजगारीला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार आहे. चुकीची आर्थिक धोरणो, भ्रष्ट प्रशासन, दृष्टिहीन नेतृत्व, निर्णय न घेणारे सरकार म्हणून काँग्रेस आघाडी सरकारची ख्याती होती. त्यामुळेच जनतेने न्याय देणारे पुरोगामी, प्रगतिशील सरकार सत्तेवर आणले आहे, असे ते म्हणाले.
मेहनत करे मुर्गा..
नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्गावर उभ्या राहिलेल्या उड्डाणपुलाबाबत ते म्हणाले, उड्डाणपुलाला वाजपेयी सरकारच्या काळातच मंजुरी मिळालेली आहे. वाजपेयी सरकारने रस्ते जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. परंतु म्हणतात ना ‘मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकीर’ अशी कोटीही त्यांनी भुजबळांचे नाव न घेता केली. (प्रतिनिधी)