Maharashtra Politics: “आमचा दसरा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असेल, बाळासाहेबांची कॉपी करुन...”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 14:55 IST2022-09-30T14:54:53+5:302022-09-30T14:55:41+5:30
Maharashtra News: स्वाभिमानी शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावर येतील, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Politics: “आमचा दसरा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असेल, बाळासाहेबांची कॉपी करुन...”: सुषमा अंधारे
Maharashtra Politics: आताच्या घडीला अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले. तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यांचे टीझरही लॉंच झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यंदाचा आमचा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असा असेल, असे अंधारे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी दोन्ही गटांकडून सुरु झाली आहे. दोन्ही गटांकडून मेळाव्यापूर्वी टीझर लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही गटाने एकमेकांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाने आपल्या टिझरमध्ये एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ.. असे कॅप्शन दिले आहे. तर, ठाकरे गटाने निष्ठेचा महासागर उसळणार असे म्हणत शिवसैनिकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावरूनही शिंदे गट आणि शिवसेनेत संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला सर्व शिवसैनिक येतील
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीझरवर शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी सडकून टीका केली. बाळासाहेबांची काॅपी करून मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.यंदाचा आमचा मेळावा हा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असा चित्र उभा करणारा असेल. उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला सर्व शिवसैनिक येतील, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वाभिमान विकून त्या पैशातून सोडलेल्या ट्रेन, वातानुकूलित बसेस किंवा पंचतारांकित हॉटेलातील जेवण असे काहीच नाही. पण प्रत्येक शिवसैनिक स्वाभिमानी आहे. स्वतःच्या कष्टातून कमावलेली भाकरी खाऊन पायी चालत तो शिवतीर्थापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे आणि निष्ठेचे हे फार मोठे द्योतक आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.
दरम्यान, शिवसेनेने जारी केलेल्या टीझरमध्ये, निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"