“उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची श्रीराम लक्ष्मणाची जोडी..,” दिपाली सय्यद यांचं ट्वीट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 15:36 IST2022-06-22T15:35:29+5:302022-06-22T15:36:14+5:30
दिपाली सय्यद यांचं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

“उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची श्रीराम लक्ष्मणाची जोडी..,” दिपाली सय्यद यांचं ट्वीट चर्चेत
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. तर एकनाथ शिंदे आता कोणती भूमिका घेतायत याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच शिवसेनेत्या नेत्या दिपाली सय्यद यांचं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल,” असं दिपाली सय्यद म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 22, 2022
आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल. @ShivSena
एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?
“संध्याकाळी आमदारांची एक बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. तो तुम्हाला संध्याकाळी कळेल,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी पुढील भूमिकेवर बोलताना दिलं. याशिवाय आपलं संख्याबळ आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि विश्वास ठेवणारे आहोत. तिच भूमिका महाराष्ट्राच्या जनतेचीही आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा का नाही, हा निर्णय त्यांचा असल्याचंही ते म्हणाले.