शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी-मतभेद दूर करून एकसंघ व्हा; गटबाजीवर एकनाथ शिंदे थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:39 IST2026-04-12T18:36:31+5:302026-04-12T18:39:24+5:30
आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही. वर्षभर नेटफ्लिक्स पाहून निवडणुकीत राजकारण करणारे नाही. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा आपला मंत्र आहे असं शिंदेंनी म्हटलं.

शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी-मतभेद दूर करून एकसंघ व्हा; गटबाजीवर एकनाथ शिंदे थेट बोलले
धाराशिव - शिवसेना हे कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये काही कुरबुरी असतील काही मतभेद असतील ते दूर करा आणि एकसंघ व्हा अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत पक्षातील गटबाजीवर भाष्य केले. धाराशिवमधील भव्य नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधून टाकली होती. ती वाचवण्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, कोणाच्या दावणीला बांधलेली नाही. मी आजही कार्यकर्ता आहे आणि जिंकणे हा आमचा हक्क आहे. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. त्यामुळे असे सत्कार स्वीकारताना अवघडल्यासारखे वाटते. हा सन्मान वैयक्तिक नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या शेकडो शिवसैनिकांच्या घामाचा आहे. तुम्ही गळ्यात घातलेल्या हारातील फुलांना तुमच्या प्रेमाचा, परिश्रमाचा, निष्ठेचा, त्यागाचा आणि बलिदानाचा गंध आहे. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आणि भावांचा आहे. माझे शिवसैनिक हेच खरे सिकंदर… तुम्हीच खरे बाजीगर आहात असं कौतुक त्यांनी कार्यकर्त्यांचे केले.
तसेच शिवसेनेचे यश हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचे फलित आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा हा विजय आहे. आपण मोठं धाडस केलं, उठाव केला पण त्या वेळी सावली नव्हती. सामान्य जनतेने डोक्यावर सावली धरली आणि शिवसैनिक भावासारखे पाठीशी उभे राहिले. असली कोण आणि नकली कोण हे वारंवार सिद्ध झालंय. शिवसेना हरवणे नामुमकिन आहे. विरोधकांचा टांगा पलटी झाला आहे असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
दरम्यान, आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही. वर्षभर नेटफ्लिक्स पाहून निवडणुकीत राजकारण करणारे नाही. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा आपला मंत्र आहे. निवडणुका झाल्यात, आता लोकांचे प्रश्न सोडवा. मी चुकलो तर मला सोडू नका… पण मी शब्द देतो, चुकणार नाही, थांबणार नाही आणि जनसेवेचा वसा कधीही सोडणार नाही. आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही, पण सामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.