शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची वकिली

By Admin | Updated: July 14, 2016 12:08 IST2016-07-14T07:58:29+5:302016-07-14T12:08:18+5:30

भाजपतंर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात असणारी नाराजी ज्या प्रकारे जाहीरपणे व्यक्त केली जात आहे त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

Shiv Sena has made the chief minister's advocacy | शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची वकिली

शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची वकिली

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १४ - भाजपतंर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात असणारी नाराजी ज्या प्रकारे जाहीरपणे व्यक्त केली जात आहे त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पंकजा मुंडे यांना काही गोष्टी सुनावल्या आहेत. त्यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडेंनी लगेच जाहीरपणे टि्वटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. 
 
त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला होता. त्यावर मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भाजप नेत्यांनी भान ठेवावे असे म्हटले आहे. अग्रलेखात काश्मीरच्या मुद्यावरुनही भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत. मेहबुबा मुफ्तीचे सरकार साफ अपयशी ठरले आहे व अख्खे कश्मीर खोरे पेटले आहे. भाजपचा एकही आमदार किंवा मंत्री त्यावर संताप व्यक्त करीत नाही. महाराष्ट्रात मात्र वेगळेच सुरू आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 
 
असे होते राक्षसराज! 
- एकाच सरकारमध्ये राहायचे, मानमरातब मिळवायचे, लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे आणि त्याच सरकारच्या मुख्यमंत्र्याचे पुतळे जाळायचे हे काही बरोबर नाही. सरकारमध्ये काम करणार्‍यांनी शिस्तीत राहायला हवे, असे मार्गदर्शन मधल्या काळात भाजपची मंडळी करीत होती. म्हणूनच बीड व पाथर्डी येथे भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुतळे जाळून निषेध केला, धिक्कार केला याचे आम्हाला आश्‍चर्य वाटत आहे. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून जावे लागले याचा संतापही खान्देशातील भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जाळपोळ, निषेध करूनच केला होता. आता हेच पक्षकार्य पंकजाताई मुंडे यांच्या नाराज समर्थकांनी केले. मंत्रिमंडळ विस्तारात पंकजाताईंचे जलसंधारण खाते काढून घेतल्याचा संताप भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ताईंचे खाते बदलले तेव्हा त्या सिंगापूरमधील एका आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेसाठी निघाल्या होत्या, पण पाणी खातेच काढून घेतल्याने संबंधित पाणी परिषदेस आपण का जावे? असा सवाल त्यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून उपस्थित केला आणि त्यांची नाराजी जगासमोर आली. यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच ‘ट्विटर’वरूनच आदेश देऊन सौ. मुंडे-पालवे यांना पाणी परिषदेस जावेच लागेल असे बजावले आणि त्यामुळे मंत्रिमंडळातील खदखद जगासमोर आली. खरं तर मुख्यमंत्री व मंत्र्यांतील हा सुसंवाद फोनवरदेखील साधता आला असता, पण तसे न होता प्रसारमाध्यमांचा जाहीर वापर त्यासाठी झाल्याने लोकांची थोडी करमणूक झाली. 
- गोपीनाथ मुंडे यांचाच स्वाभिमानी बाणा दाखवत पंकजाताईंनी सौम्य राडा केला असला तरी मंत्रिमंडळात फेरबदल करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार असतो. पंकजाताई अधूनमधून ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ अशी इच्छा व्यक्त करीत असतात, पण मुख्यमंत्री कोणी व्हायचे हा निर्णय आताही दिल्लीतूनच घेतला जातो. त्यामुळे पंकजाताईंनी राजकीय चिंतन करून नवे आडाखे बांधायला हवेत. खडसे यांनाही मुख्यमंत्री व्हायचेच होते व त्यासाठीच त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडायला लावली. (अशी फुशारकी ते मारतात!) पण आज खडसे घरी आहेत व देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री आहेत. 
- चाणक्याने असे लिहून ठेवले आहे की, राजकारण्याच्या नशिबाची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अर्थात काही लोकांना पदे कर्तबगारीवर मिळतात तर अनेकांना ती नशिबाने मिळतात, पण नशिबाने एखादे पद मिळाले नाही म्हणून ज्या घरात आपण बसलोय त्या घरालाच आग लावायची काय? घरात ढेकूण फार झाले म्हणून घर जाळावे काय? याचाही विचार करावा लागेल. महाराष्ट्रात भाजपच्या वाट्यास आज जे आले आहे ते मोदींच्या नशिबाने लाभले आहे, पण हे भाग्य प. बंगाल, तामीळनाडू, केरळ, बिहारच्या भाजप कार्यकर्त्यांना लाभले नाही. म्हणून तेथे आदळआपट नाही व संतापाची फडफड नाही. महाराष्ट्रात भाजपचे लोक आपल्याच मुख्यमंत्र्यांचा पुतळा फुंकतात. वास्तविक हे सर्व करण्याची गरज जम्मू-कश्मीरात आहे. तेथे मेहबुबा मुफ्तीचे सरकार साफ अपयशी ठरले आहे व अख्खे कश्मीर खोरे पेटले आहे. भाजपचा एकही आमदार किंवा मंत्री त्यावर संताप व्यक्त करीत नाही. महाराष्ट्रात मात्र वेगळेच सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा, कुजबुज मोहिमा चालल्या आहेत. पुतळे जाळून निषेध केला जात आहे. खडसे यांनी तर कपट-कारस्थानांचा गौप्यस्फोट करण्याचे ठरवले तर देश हादरेल, असे बजावले होते. हासुद्धा शिस्तभंगच म्हणावा लागेल. पण हे भाजपाअंतर्गत धुमशान आहे. सरकारविरोधात घोषणा देणारे व मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळणारे लोक त्यांच्याच पक्षाचे आहेत. मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भान ठेवायला हवे. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जत केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांना आता अधिक सावधान राहावे लागेल.

Web Title: Shiv Sena has made the chief minister's advocacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.