शिवसेनेत एक वर्षही पूर्ण न झालेल्या नेत्याला राज्यसभेचं 'बक्षीस'; ज्येष्ठांना डावललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 13:27 IST2020-03-12T12:59:42+5:302020-03-12T13:27:35+5:30
Rajyasabha Election चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते यांना मागे टाकत मिळवली उमेदवारी

शिवसेनेत एक वर्षही पूर्ण न झालेल्या नेत्याला राज्यसभेचं 'बक्षीस'; ज्येष्ठांना डावललं
मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावतेंची नावं चर्चेत होती. मात्र शिवसेना नेतृत्त्वानं चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली.
अकरा महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. चतुर्वेदी या पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय मानल्या जातात. शिवसेनेत प्रवेश करताना आदित्य यांनीच त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. आदित्य यांच्या निकटवर्तीय असल्यानं राज्यसभेच्या शर्यतीत चतुर्वेदी यांचं पारडं जड मानलं जात होतं. अखेर पक्षातल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मागे टाकत चतुर्वेदी यांनी उमेदवारी मिळवली.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते हे वरिष्ठ नेते पराभूत झाले. त्यामुळे यापैकी एका नेत्याला राज्यसभेत संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेना-भाजपा सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून काम केलेले दिवाकर रावते यांचं नावदेखील चर्चेत होतं. ज्येष्ठ नेत्याला राज्यसभेत संधी मिळावी असा मोठा मतप्रवाह शिवसेनेत होता.