shiv sena expels party leader for supporting nanar refinery project | नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी

नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी

ठळक मुद्देशिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होतेशिवसेना पक्षप्रमुखांनी कोकण दौऱ्यात नाणारला असलेल्या विरोधाचा पुनरुच्चार केला होताशिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी; इतर पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची शक्यता

सिंधुदुर्ग: नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं. मात्र यानंतर लगेचच काही शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यामुळे प्रकल्पाबद्दल शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणाची पक्षानं गंभीर दखल घेतली आहे. सागवे येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांची उचलबांगडी केली आहे. याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांचीदेखील हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. 

नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (१७ फेब्रुवारी) शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या  प्रकरणी विभागप्रमुख राजा काजवे यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काजवे यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबद्दलचा अहवाल पक्षाकडून मागवण्यात आला आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. 

काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये जाहिरात आली होती. पण जाहिरातदार शिवसेनेचं धोरण ठरवत नाहीत. शिवसेनेचे धोरण आणि भूमिका मी ठरवत असतो, असं ठाकरे म्हणाले. नाणार प्रकल्प बंद आहे. तो सुरू होणार नाही. जाहिरातीमुळे शिवसेनेची भूमिका बदलत नाही. बदलणार नाही. नाणारला विरोध हा कायमच राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

एका बाजूला उद्धव ठाकरे नाणारला विरोध असल्याचं निक्षून सांगत असताना दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते. 'नाणार प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्यानं आम्ही त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलो आहोत. या प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार निर्माण होणार आहेत. मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. स्थलांतर कमी होणार आहे', असं शिवसैनिकांनी सांगितलं. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता. मात्र आता आम्ही या प्रकल्पाचं समर्थन करतो, असंदेखील ते पुढे म्हणाले होते. 
 

Web Title: shiv sena expels party leader for supporting nanar refinery project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.