खड्ड्यांवरून शिवसेना-भाजप आमने-सामने
By Admin | Updated: July 12, 2016 21:59 IST2016-07-12T21:59:07+5:302016-07-12T21:59:07+5:30
राज्य शासनाच्या अखत्यारितील रस्त्यांचे खड्डे दाखविणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपानेच आज खड्ड्यांचे दर्शन घडविले़

खड्ड्यांवरून शिवसेना-भाजप आमने-सामने
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - राज्य शासनाच्या अखत्यारितील रस्त्यांचे खड्डे दाखविणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपानेच आज खड्ड्यांचे दर्शन घडविले़ तर महापौरांसह शिवसेना नेत्यांचेच रस्ते कसे खड्ड्यात आहेत, याचा पुरावा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी प्रदर्शनातून दिला़ या प्रदर्शनानंतर काँग्रेस आता आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पॉटहोल दिंडी काढून शिवसेनेला आव्हान देणार आहे़ मित्रपक्ष आणि विरोधकांच्या या आक्रमकतेमुळे शिवसेनेच्या तोंडाला फेस आला आहे़ महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईत ६६ खड्डे असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले़ विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीमच सुरु केली़ मात्र विरोधी पक्षांऐवजी सध्या मित्रपक्षच शिवसेनेसाठी डोकेदुखीचे कारण ठरले आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्त्यांची पाहणी करुन शिवसेनेने भाजपालाच लक्ष्य केले़ याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने पूर्व उपनगरातील रस्त्यांची पाहणी करुन महापालिकेच्या रस्त्यांवर खड्ड्यांचा नजराणा महापौर स्रेहल आंबेकर आणि अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना दिला़ मात्र भाजपा नेत्यांनी नोंदविलेले निरीक्षणांचे दखल घेणार, असा बचाव करीत महापौर स्रेहल आंबेकर यांनी युतीतील वादावर पांघरुण घातले़ शिवसेना नेत्यांचे वॉर्ड खड्डयात मुंबई खड्ड्यात की खड्ड्यात मुंबई हे प्रदर्शन काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आज भरविले होते़ या कार्यक्रमाला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते़ मात्र या प्रदर्शनाला सत्ताधारी पक्षातील एकाही नेत्याने हजेरी लावली नाही़ या प्रदर्शनात राणे यांनी ४५० खड्ड्यांचे छायाचित्र मांडली होती़ यामध्ये महापौर स्रेहल आंबेकर, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पटेल, शिवसेनेचे राजू पेडणेकर अशा युतीच्याच नगरसेवकांच्या वॉर्डातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात असल्याचे दिसून आले़ खड्डे नागरिकांची जबाबदारी़ महापौर अनेक वादग्रस्त विधान करुन गोत्यात आलेल्या महापौर स्रेहल आंबेकर यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिने उरले आहेत़ तरीही हास्यास्पद व वादग्रस्त विधान करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिटलर संबोधून त्यांनी भाजपाचा रोष ओढावून घेतला होता़ त्यानंतर वृत्तपत्र माझ्या बातम्यानेच चालतात, असे विधान काही महिन्यांपूर्वी त्यांनी केले होते़ मात्र आता खड्डेही नागरिकांचीही जबाबदारी आहे़ तक्रार करण्यापूर्वी तो रस्ता कोणाचा आहे, याची माहिती असावी, असे मत व्यक्त करीत त्यांनी अधिकाऱ्यांना रस्ता कोणाचा त्या यंत्रणेचे नावही त्या ठिकाणी लिहिण्यास सांगितले़ नगरसेविकाही खड्ड्यात पडते तेव्हा पायधुनी विभागातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी या आज त्यांच्या विभागातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्या असता रहमतुल्ला मार्गावरील एका खड्ड्यात त्यांचा पाय गेला व त्या पडल्या़ यात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे़ त्यांच्यावर जे़जे़ रुग्णालयात उपचार करण्यात आले़ खड्ड्यांबाबत तक्रार करुनही प्रशासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ या वॉर्ड काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोही केला़ काँग्रेसची आता पॉटहोल दिंडी मनसेने सेल्फी विथ खड्डे हे आंदोलन केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी खड्ड्यांचे प्रदर्शन भरविले व भाजपाने मिशन खड्डे ही मोहीम उघडली आहे़ त्यानंतर आता काँग्रेसने आषाढी एकादशीच्या मुहर्तावर पॉटहोल दिंडी काढण्याचा इशारा दिला आहे़ त्यानुसार १५ जुलै रोजी ११ वाजता फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालयापर्यंत असा या दिंडीचा प्रवास असणार आहे़ प्रशासन व अधिकारी शिवसेनेचे ऐकत नसल्यानेच रस्त्यांची पाहणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे़ त्यामुळे त्यांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असे मत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी खड्डे प्रदर्शनावेळी व्यक्त केले आहे़