Uddhav Thackeray Live: शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द; उद्धव ठाकरे याचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:45 IST2022-06-22T17:45:30+5:302022-06-22T17:45:46+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला

Uddhav Thackeray Live: शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द; उद्धव ठाकरे याचं वक्तव्य
“अनेक महिन्यांनंतर समोर आल्यानंतर बोलणार काय हे तुम्ही विचार करत असाल. कोविड काळात जे काही लढलो, प्रशासनाचा अनुभव नव्हता. अशा काळात कोणी तोंड देऊ शकलं नव्हतं, अशा प्रशासन माहित नसलेल्या माणसाच्या वाट्याला सुरूवातीला कोविड आला. त्या दरम्यानच्या काळात जे सर्व्हे होत होते तेव्हा देशातील पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गणना होत होती,” असं मुख्यमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मला भेटणं जमत नव्हतं हे सत्य होतं. जी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतरचे महिने विचित्र होते. त्या काळात कोणाला भेटत नव्हतो हा मुद्दा बरोबर होता. आता सुरू केलं आहे. मी पहिली कॅबिनेट मीटिंग रुग्णालयातून केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द आहेत. ते कदापि वेगळे होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत काही जण अयोध्येलाही जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानभवनात बोलणारा कदाचित मी पहिला मुख्यमंत्री असेन असंही ते म्हणाले.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. दरम्यान, यावर ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. “शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्री दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. काही जण आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काय मी केलं? २०१४ मध्येही ६३ आमदार निवडून आणले तीदेखील बाळासाहेबांच्या नंतरचीच शिवसेना होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काल परवा जी काही निवडणूक झाली, त्याच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये आमदार होते. ज्यांना आपण आपलं मानतो, जनता शिवसेनेच्या विचारावर निवडून देतो, त्यांनाही आपल्याला एकत्र ठेवावं लागतं. मला कशाचाही अनुभव नव्हता. मी इच्छेपेक्षा जिद्दीनं करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीनं मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणार म्हणून रणांगणात उतरलो. तिन्ही पक्षांशी बैठक झाली आणि त्यानंतर बाजूला खोलीत गेल्यावर शरद पवारांनी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असं म्हटलं. मी साधा महापालिकेतही गेलो नव्हतो मुख्यमंत्री कसा होणार असं विचारलं. राजकारण कसंही वळण घेऊ शकतं. पण त्यालाही अर्थ हवा, असंही त्यांनी नमूद केलं.