ठाकरे आणि शिंदे गटात मनोमिलन?; जळगावच्या 'या' फोटोमुळे राजकीय चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 05:15 PM2022-08-31T17:15:14+5:302022-08-31T17:17:39+5:30

धरणगावातली श्रीजी जिनिंग ही शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मालकीची आहे. शिवसेनेत फूट पडली तरी ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले.

Shinde group minister Gulabrao Patil attended the program of Uddhav Thackeray group leader in jalgaon | ठाकरे आणि शिंदे गटात मनोमिलन?; जळगावच्या 'या' फोटोमुळे राजकीय चर्चेला उधाण

ठाकरे आणि शिंदे गटात मनोमिलन?; जळगावच्या 'या' फोटोमुळे राजकीय चर्चेला उधाण

Next

प्रशांत भदाणे

जळगाव - राज्यात शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. अशातच जळगावात एका कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकत्र आल्याचं दिसून आल्यानं विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

जळगावीतल एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आले होते. त्यांच्यासोबत त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबत निष्ठेने राहिलेले गुलाबराव वाघही दिसून आले. राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद आहेत. असं असलं तरी जळगावात मात्र या दोन्ही गटाचे नेते एकत्र आले होते याचं निमित्तही खास होते.  जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथं श्रीजी जिनिंगमध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला. या कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 

धरणगावातली श्रीजी जिनिंग ही शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मालकीची आहे. शिवसेनेत फूट पडली तरी ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. आता त्यांच्या जिनिंगमध्ये कार्यक्रम असल्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे त्याठिकाणी येतील का? याबाबत शंका होती, पण गुलाबराव पाटील आले. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे इतर कार्यकर्ते पण आले. दुसरीकडे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि त्यांचे कार्यकर्तेही त्याठिकाणी उपस्थित होते. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, राजकारणात हे चालत असतं. आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे वेगवेगळे आहेत. मग ते काय एकमेकांच्या सुख-दुःखात जात नाहीत का? राजकारणाच्या आखाड्यात जो तो ज्याची त्याची कुस्ती लढेल. पण व्यक्तिगत संबंध खराब करणारा मी माणूस नाहीये. आणि आम्ही काय एकमेकांना गोळ्या मारलेल्या नाहीयेत असं स्पष्टीकरण मंत्री पाटलांनी दिले. 
 

Web Title: Shinde group minister Gulabrao Patil attended the program of Uddhav Thackeray group leader in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.