लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात तीन दिवसांनंतरही पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आरडाओरडा केला नाही म्हणून बलात्कार झाला, असे बेजबाबदार वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गृहराज्यमंत्री कदम यांनी गुरुवारी येथे माध्यमांशी बोलताना पोलिसांची अकार्यक्षमता लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या घटनेला डेपो मॅनेजर जबाबदार असल्याचे ठासून सांगितले. वर कहर म्हणजे ते म्हणाले की, “विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतंही आर्ग्युमेंट, कुठलंही फोर्स, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे, हाणामारी झालेली आहे, असं काहीच घडलेलं नाही. त्यामुळे आसपास असलेल्या सर्वसामान्यांनादेखील ते कळलं नाही. ज्यावेळी आरोपी आपल्या ताब्यात येईल, तेव्हाच आपल्याला माहिती मिळेल.”
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कदम यांचे हे वक्तव्य समस्त महिलांचा अपमान करणारे असून त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे.
बसस्थानक आणि आगारांचे आता सुरक्षा ऑडिट होणार
मुंबई : राज्यातील सर्वच बसस्थानके व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण केले जाणार आहे. तसेच वापरात नसलेल्या, धूळखात पडलेल्या बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांची १५ एप्रिलपर्यंत विल्हेवाट लावण्यात येणार आहे.पुण्यातील स्वारगेट स्थानकातील बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील बसस्थानकांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.
परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर उपस्थित होते.
राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपद आहे. मात्र, हे पद अनेक वर्षे रिक्त असून, या पदावर भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव गृह विभागाला सादर करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या. बसस्थानकावर महिला सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला.