Sharad Pawar's rainy rally 'hopeful' for NCP! | शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे राष्ट्रवादी आता 'आशावादी' !
शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे राष्ट्रवादी आता 'आशावादी' !

मुंबई - निवडणुकीला दहा-बारा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे वृत्तवाहिण्यांवर सर्वत्र पवारच दिसत होते. यातून राष्ट्रवादीला उभारी येणार अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, ऐनवळी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने 'ईडी'मुळे तयार झालेला टेम्पो खाली आला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांची साताऱ्यातील सभा पावसामुळे चर्चेत आली असून ही सभा राष्ट्रवादीसाठी 'टर्निंग पॉईंट' ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांनी पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले. एवढच नाही तर राज्यात काढलेल्या दौऱ्यातून पवारांनी तरुणांना आकर्षित करण्यात यश मिळवले. त्यातच ईडीनेदाखल केलेल्या गुन्ह्यामुळे पवाराविषयी आणखीच  आकर्षण निर्माण झाले. एकंदरीत पवारांचा झंझावात निर्माण झाला होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे माध्यमांचं लक्ष शरद पवारांवरून बाजुला गेले होते.

या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील अजित पवारांवर निशाना साधला होता. शरद पवारांनी तयार केलेला टेम्पो अजित पवारांनी घालवल्याचं त्यांनी म्हटले होते. मात्र आता शरद पवारांनी पुन्हा एकदा तसाच 'टेम्पो' तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांना बऱ्याच अंशी यशही आले आहे. साताऱ्यात मुसळधार पावसात केलेल्या भाषणामुळे पवार सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. मतदानाच्या दोन दिवसआधी घडलेली ही घटना राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणुकीत आशादायी ठरू शकते.

दरम्यान शरद पवारांनी लोकसभा पोट निवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या उमेदवारांसाठी ही सभा घेतली होती. या सभेत मुसळधार पावसातही श्रोत्यांनी केलेली गर्दी उदयनराजे यांची चिंता वाढवणारी असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे.

 


Web Title: Sharad Pawar's rainy rally 'hopeful' for NCP!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.