चंद्रपूरसारखी यवतमाळमध्ये दारुबंदीची शरद पवार यांची मागणी
By Admin | Updated: September 27, 2015 05:38 IST2015-09-27T05:38:20+5:302015-09-27T05:38:20+5:30
वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

चंद्रपूरसारखी यवतमाळमध्ये दारुबंदीची शरद पवार यांची मागणी
मुंबई : वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
पवार यांनी अलिकडेच विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागाच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पवार यांनी म्हटले आहे, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमालास योग्य बाजारभावाचा अभाव यांच्या दुष्टचक्रातून सुटका न होणे ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. वैफल्यग्रस्त शेतकरी व्यसनाधीनतेकडे झुकून मृत्यूला कवटाळण्याचे प्रकार होत असल्याचे आत्महत्याग्रस्त गावांतील महिलांनी आपल्याला सांगितले. गावातून दारू हद्दपार करण्यासाठी त्या गावातील ५० टक्के महिला मतदारांनी दारुबंदीसाठी मतदान करणे अनिवार्य असते. मतांची ही टक्केवारीची अट नापिकी आणि आत्महत्याग्रस्त भागात सरकारने कमी करावी. तसेच, यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीचा विचार करावा.
नापिकी आहे आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे त्या भागात सरकारने कर्जमाफी करावी. संपुआ सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी कापसाला प्रतिक्विंटल ६५०० रुपये आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी केली,असे पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत शेतजमीन कर्त्याच्या नावावर असल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावर नसते. या शिवाय, वर्षानुवर्षे जमीन कसत असणारे कूळ, सरकारी जमिनींवरील जुन्या अतिक्रमणदार शेतकऱ्यांची, देवस्थान जमिनींवरील जुन्या वहिवाटदारांची नावे हक्क-अभिलेखी मालकी हक्कात नमूद नसतात. म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्याच्या सरकारी निकषांत बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.